आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच हजारो संकटांना तोंड देणारा चेन्नईचा संघ अखेरपर्यंत उभारी घेऊच शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीनेही यंदा निराशाच केली. यंदाच्या हंगामात झालेल्या खराब कामगिरीनंतर चेन्नईच्या संघात मोठे बदल होतील अशा बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या. अनेकांनी पुढील हंगामासाठी धोनीऐवजी दुसऱ्या खेळाडूकडे चेन्नईचं नेतृत्व सोपवावं अशीही मागणी केली. परंतू गौतम गंभीरच्या मते CSK ची टीम मॅनेजमेंट पुढील हंगामासाठी धोनीकडेच संघाचं नेतृत्व सोपवेल.

“मी आतापर्यंत अनेकदा हे सांगत आलोय की चेन्नईचा संघ यशस्वी ठरण्यामागे सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे धोनी आणि संघमालकांमध्ये असलेलं नातं. टीम मॅनेजमेंटने धोनीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे आणि धोनीही त्याबद्दल नेहमी त्यांचा आदर करतो. त्यामुळे पुढच्या हंगामातली त्यांनी धोनीकडेचं संघाचं नेतृत्व सोपवलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. पुढच्या वर्षीही धोनी चेन्नईचा कर्णधार झाला तर चेन्नईच्या संघात अमुलाग्र बदल दिसून येतील.” गौतम गंभीर ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

तेराव्या हंगामात धोनीने फलंदाजीत पूर्णपणे निराशा केली. तसेच मैदानात संघ निवडताना त्याने घेतलेल्या काही निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. परंतू गंभीरच्या मते आतापर्यंत धोनीने चेन्नईसाठी जे काही गेलंय ते पाहता त्याला संघाकडून एक संधी मिळणं गरजेचं आहे. तेराव्या हंगामात चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही आपले उर्वरित दोन सामने जिंकत धोनीचा संघ इतर संघांचं प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याचं स्वप्न संपवू शकतो.

अवश्य वाचा – IPL 2020 : एक हंगाम खराब गेल्यामुळे धोनी लगेच वाईट कर्णधार ठरत नाही – अंजुम चोप्रा