सर्वाधिक शाळा आणि विद्यार्थी असल्याचा गेली अनेक वर्षे मुंबईकडे असलेला मान आता शेजारच्या ठाणे जिल्ह्य़ाकडे गेला आहे. ठाण्यातील तब्बल ६,४०७ शाळांमधून सध्या सुमारे १६ लाख ५५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. तर मुंबई शहर आणि उपनगर मिळून हे प्रमाण ३,५८० शाळा आणि १५ लाख विद्यार्थी असे आहे. त्या खालोखाल पुण्यातील ६३४४ शाळांमध्ये १३ लाख १९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुंबईचा शहराचा विकास जागेच्या मर्यादेमुळे मंदावला. ठाणे जिल्ह्य़ामध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त आहे. परिणामी गेल्या पाच वर्षांत येथील शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ठाणे आणि पुण्यात जागेची कमतरता नाही. अर्थात मुंबईप्रमाणे या शहरांनाही एका ठराविक सामाजिक आवर्तनातून जावे लागेल, अशी प्रतिक्रिया ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’चे माजी विभागप्रमुख जी. वानखेडे यांनी दिली. म्हणूनच २०१०-११पासून मुंबईतील (खासकरून मुंबई शहर) विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसते. पुणे आणि ठाण्यात ती वाढते आहे.
मोठय़ा शिक्षणसंस्थाही या ठिकाणी शाळा सुरू करू लागल्या आहेत. या वर्षी रिलायन्स फाऊंडेशन, पोदार स्कूल यांनी नवी मुंबईत शाळा सुरू केली असून त्यांना चांगलाचा प्रतिसाद लाभतो आहे.
येथील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रवेश प्रक्रियेलाही चांगला प्रतिसाद लाभतो आहे.
– अवनिता बीर,
मुख्याध्यापक, पोदार शाळा
येथील लोकसंख्या पाहता येथील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत.
– वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ