आपल्या संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी कार्यरत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ‘तक्रार निवारण समिती’चे आदेश संस्थाचालक जुमानत नसल्याने ही समिती जवळपास निष्प्रभ झाल्यात जमा आहे. परिणामी महाविद्यालयांचे फावले असून तक्रारदार शिक्षकांनाच लक्ष्य करून त्यांच्यावर सूड उगवला जात आहे, असा गंभीर आरोप शिक्षकांकडून होतो आहे.
आता तर ज्यांच्याविरोधात तक्रारी होत्या तेच या समितीचे सदस्य म्हणून मिरवीत आहेत. त्यामुळे, समितीने गेल्या दहा वर्षांत दिलेल्या २०० आदेशांची अद्याप अंमलबजावणीच झालेली नाही, असा आरोप ‘बुक्टू’ या मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेच्या सरचिटणीस डॉ.मधू परांजपे यांनी केला. म्हणूनच श्रेयांक-श्रेणी पद्धतीतील गोंधळ आणि प्राध्यापकांच्या रखडलेल्या बढत्या या दोन मुद्दय़ांबरोबरच निष्प्रभ ठरलेल्या ‘तक्रार निवारण समिती’च्या कारभाराचा मुद्दाही ‘बुक्टू’ला आपल्या आंदोलनात समाविष्ट करावा लागला. गुरुवारी या प्रश्नांवरून ५०० हून अधिक प्राध्यापकांनी ‘बुक्टू’च्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात जोरदार निदर्शने केली.
‘या समितीकडे मोठय़ा प्रमाणावर तक्रारी प्रलंबित आहेत. ज्या तक्रारींवर निर्णय झाला आहे, त्यावर वर्षांनुवर्षे कारवाई झालेली नाही. प्र-कुलगुरूंनी या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेण्याआधी समितीच्या बैठका वेळोवेळी होत असत. प्रत्येक बैठकीत साधारणपणे १४ तक्रारींवर सुनावणी होई. तसेच, किमान २० तक्रारींची तड लागे. मात्र, प्र-कुलगुरूंना समितीची सूत्रे हाती घेतल्यापासून समितीच्या बैठकांमध्ये खंड पडू लागला. यामुळे, ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, अशा महाविद्यालयांचे व संस्थाचालकांचे फावले आहे. समितीच्या निष्क्रियतेचा फायदा संस्थाचालक उठवीत असून तक्रारदारांनाच येनकेनप्रकारेण त्रास देऊन त्यांच्यावर सूड उगवला जात आहे,’ अशी थेट टीका ‘बुक्टू’ने केली आहे.
समितीने आजवर घेतलेल्या निर्णयांची विनाविलंब अंमलबजावणी करा आणि जी महाविद्यालये जुमानणार नाहीत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करा, अशी मागणी विद्यापीठात झालेल्या निदर्शनांदरम्यान करण्यात आली.
मुंबई विद्यापीठाचा दर्जा केवळ प्रशासनाच्या स्तरावरच नव्हे तर शैक्षणिकदृष्टय़ाही घसरल्याची टीका या वेळी ‘बुक्टू’चे अध्यक्ष सी. आर. सदाशिवन यांनी केली. निकाल वेळेत लावण्याच्या नावाखाली शैक्षणिक दर्जाशी तडजोडी करून परीक्षेचे काम केले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथून प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या श्रेयांक-श्रेणी पद्धतीला विरोध करणाऱ्या तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांच्या सहय़ांचे निवेदन यावेळी विद्यापीठाला देण्यात आले.
कुलगुरूंशी भेट नाहीच
आंदोलनादरम्यान आपण विद्यापीठात नसल्यामुळे शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्र-कुलगुरूंना द्यावे, असे कुलगुरू राजन वेळुकर यांनी ‘बुक्टू’ला कळविले होते. मात्र, आम्हाला या प्रश्नावर केवळ कुलगुरूंशीच चर्चा करायची आहे. त्यामुळे, आम्ही प्र-कुलगुरूंना भेटणार नाही, असा पवित्रा घेत ‘बुक्टू’ने केवळ कुलसचिवांना भेटून विद्यार्थ्यांच्या सहय़ांचे निवेदन सादर केले. कुलगुरूंनी येत्या आठवडाभरात आमच्याशी या प्रश्नांवर चर्चा केली नाही तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा ‘बुक्टू’ने दिला आहे.
‘बुक्टू’च्या मागण्या
*श्रेयांक-श्रेणी पद्धतीत बदल करा.
*प्रत्येक सत्रात एकच चाचणी किंवा असाइनमेंट असावी.
*अतिरिक्त परीक्षेचे शुल्क कमी करा
*स्केलिंग डाऊन नको
*शिक्षकांच्या रखडलेल्या बढत्यांचा व पदोन्नतीचा प्रश्न जिल्हावार शिबिरे भरवून निकाली काढा
*तक्रार निवारण समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करा