मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची निवड सारासार विचार न करता झाल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काढल्याचे पडसाद शुक्रवारी विधान परिषदेतही उमटले. डॉ. वेळूकरांना या पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेत शुक्रवारी करण्यात आली. तर अ‍ॅडव्होकेट जनरलचा अहवाल आल्यानंतर राज्यपाल व कुलपतींकडून कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
विधान परिषदेचे सदस्य हेमंत टकले यांनी याबाबत सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून ही मागणी केली.  गोपीकिशन बाजोरिया यांनी देखील या विषयाबाबत सरकारने लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.  
 या मागणीवर बोलताना उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ हे स्वायत्त असल्याने सरकारने विद्यापीठाला आदेश देणे शक्य नाही.  अनेक विद्यार्थी संघटनांनी सुद्धा यासंदर्भात मागणी केली आहे. महाधिवकत्यांकडून याबाबत माहिती मागवण्यात आली आहे व ती मिळाल्यानंतर कुलपतींशी याविषयी सरकार चर्चा करेल, असे तावडे म्हणाले.