कुलगुरू राजन वेळुकर जोपर्यंत आमच्याशी चर्चा करीत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या बैठकीवर आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला.
विद्यापीठाचा शैक्षणिक व प्रशासकीय कारभार सुधारण्यासाठी प्र-कुलगुरू नरेशचंद्र आणि कुलसचिव एम. ए. खान यांनी मंगळवारी कलिना येथील आंबेडकर भवन येथे आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, ‘याआधी ११ जानेवारीला भेटून आम्ही आमच्या मागण्या त्यांच्या कानावर घातल्या होत्या. आम्हाला त्यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हाच आता फक्त कुलगुरूंना भेटून आमच्या मागण्या त्यांच्या कानावर घालायच्या आहेत,’ असे आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र ‘तरीही मंगळवारच्या बैठकीला कुलगुरू अनुपस्थित राहिले. परिणामी उपोषण आंदोलन करणाऱ्या १० विद्यार्थ्यांपैकी एकही जण या बैठकीत सहभागी झाला नाही,’ असे ‘सेव्ह मुंबई विद्यापीठ’च्या (सेव्हएमयू) आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आम्हाला कुलगुरूंशी बोलायचे आहे. त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली तर आम्ही विद्यापीठ प्रशासनाशी सहकार्य करण्यास तयार आहोत, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठातर्फे मात्र या बैठकीत संपकरींपैकी केवळ तीन विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी एकही विद्यार्थी अर्थशास्त्र विभागाचा नव्हता, असे
विद्यापीठाने म्हटले आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या मागण्यांपैकी काहींची पूर्तता आम्ही केली आहे. उर्वरित मागण्यांचा विद्यापीठ प्रशासनाकडून लवकरच विचार करण्यात येईल, असे विद्यापीठाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.