विहिंपचे ज्येष्ठ नेते, माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या निधनाच्या वृत्तामुळे करवीरनगरीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये शोकाकुल वातावरण होते. विहिंपच्या बांधणीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नापासून ते करवीरनगरीतील त्यांच्या वास्तव्याबद्दलच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.
कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सिंघल यांच्या व्यक्तिमत्त्वाने मोहिनी घातली होती. लालकृष्ण अडवाणी, सिंघल यांनी केलेल्या आवाहनानुसार राममंदिर कारसेवेसाठी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते उत्तर भारतात गेले होते. काहींनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याच्या मोहिमेत भागही घेतला होता. तेव्हा सिंघल यांच्याशी संपर्क झाला होता.
करवीरपीठाचे विद्यमान शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांचा दीक्षान्त समारंभ दशकभरापूर्वी झाला होता. तेव्हा रा.स्व. संघाचे सरसंघसंचालक के.सुदर्शन व विहिपचे अध्यक्ष अशोक सिंघल हे हिंहदुत्ववादी परिवारातील दोन्ही ज्येष्ठ नेते येथे उपस्थित होते. या कार्यक्रमात झालेल्या एका विधानामुळे शहरातील वातावरण गढूळ बनले होते. यातून पुरोगाम्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंदुत्ववाद्यांनी प्रत्युत्तर देणारा मोर्चा काढला होता, अशी आठवण विहिंपचे जिल्हामंत्री श्रीकांत पोतनीस यांनी दिली. कोल्हापुरातून ते नवी दिल्लीला गेले तरी येथील दैनंदिन घडामोडीची माहिती ते घेत होते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रांतस्तरावरील बैठकांना ते स्वत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत होते. तीन वर्षांपूर्वी सिंघल, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासमवेत झालेल्या बैठकी वेळी त्यांचे अखेरचे दर्शन घडले. तेव्हा ते थकलेले असले तरी त्यांच्यातील जोम जाणवण्यासारखा होता, असेही पोतनीस यांनी सांगितले.
सिंघल हे कोल्हापुरात आले तेव्हा त्यांच्या रेल्वेच्या परतीचे तिकिट निश्चित झाले नव्हते. त्याची जबाबदारी त्यांनी आत्ताचे शहरमंत्री महेश उरसाल यांच्याकडे सोपवली होती. याबाबत रेल्वेस्थानक प्रमुखांशी संपर्क साधला असता सिंघल यांचे नाव ऐकून अधिकाऱ्यांनी त्यांची प्रवासाची सोय करण्याचा शब्द देतानाच त्यांचे रेल्वे स्थानकावर योग्य ते आदरातिथ्य केले होते, असे उरसाल यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2015 रोजी प्रकाशित
अशोक सिंघल यांच्या आठवणींना उजाळा
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये शोकाकुल वातावरण
Written by अपर्णा देगावकर

First published on: 18-11-2015 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok singhals memories recalled