जातपडताळणी समितीने जातीचा दाखला अवैध ठरवल्याने काँग्रेस नगरसेवक डॉ. संदीप नेजदार व भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक नीलेश देसाई यांचे नगरसेवकपद शुक्रवारी रद्द झाले. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी आता ४ नगरसेवक घरी बसणार आहेत.
महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती, काँग्रेस नगरसेविका वृषाली कदम आणि भाजप नगरसेवक संतोष गायकवाड यांना विभागीय जातपडताळणी समितीने हे आदेश दिल्याने नगरसेवकपद रद्द कारवाईला सामोरे जावे लागले होते.
जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर केली नसल्याने महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह महानगरपालिकेचे २० नगरसेवक अडचणीत आले आहेत. अनेक नगरसेवकांवर जातपडताळणी समितीची टांगती तलवार आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या २२, तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ११ प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांना जातपडताळणी प्रमाणपत्र पुढील सहा महिन्यात महानगरपालिकेला सादर करणे राज्य निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. ही मुदत शनिवारी सायंकाळी संपली असताना केवळ १३ नगरसेवकांनीच आतापर्यंत असे जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे तर उर्वरित २० नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी विभागीय जातपडताळणी समितीसमोर सुरू आहे. निवडणूक आयोगाची मुदत संपली तरीही जातपडताळणी प्रमाणपत्र हातात पडले नसल्याने या नगरसेवकांची घालमेल वाढली होती. जातपडताळणी समितीने जातीचा दाखला अवैध ठरवल्याने डॉ. संदीप नेजदार व नीलेश देसाई यांचे नगरसेवकपद शुक्रवारी रद्द झाल्यामुळे काँग्रेसचे २, भाजप व ताराराणी यांच्या प्रत्येकी १ नगरसेवकास फटका बसला आहे.