कोल्हापूर : इचलकरंजी येथे काल न्यायालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात अमर निवृत्ती मगदूम (रा. वेताळ पेठ) व त्यास मदत करणारा आरीफ बशीर मोमीन (रा. वेताळ पेठ) या दोघांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आवळे गल्ली येथे जुगार क्लबवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामध्ये अमर मगदूम यालाही अटक करण्यात आली होती. त्याने न्यायालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो बचावला. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. जुगार क्लबवरील कारवाईनंतर पोलिसांकडून दिलेली वागणूक व मुंडण या नैराश्येतूनच मगदूम याने हे कृत्य केल्याची चर्चा होती.

बडतर्फीची मागणी

सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी मानवी हक्कांची पायमल्ली करत पकडलेल्या संशयित आरोपींचे मुंडण केले. त्यांचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असून त्यांना तातडीने बडतर्फ करावे, ६ डिसेंबपर्यंत कारवाई न झाल्यास विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पार्टीचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र भोरे याच्या आत्मदहनाला काही अंशी लोहार हेही जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. लोहार यांचा दंडुकेशाहीचा वापर करीत असल्याने मानवी हक्क पायदळी तुडवला जात असल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, असे कांबळे म्हणाले.