दयानंद लिपारे

भक्कम महायुतीचा मुकाबला करण्यासाठी ताकदवान महाआघाडी करण्याचे प्रयत्न राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला माकप, भाकप, जनता दल, शेकाप, आंबेडकरवादी संघटना यांना सामावून घेण्याचे वरिष्ठ स्तरावरून जोरदार प्रयत्न झाले असले तरी त्यांच्यात सन्मानाचे स्थान मिळाल्याची भावना नाही. डाव्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले, अशा त्यांच्या प्रतिRिया आहेत. त्यामुळे महाआघाडी नावाचे ‘ऐक्य’ हे फार्स ठरले की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे आव्हान मोडून काढायचे असेल तर समविचारी पक्ष, संघटनांना एका छताखाली आले पाहिजे, या भूमिकेतून आघाडीने जोरदार प्रयत्न केले. मात्र बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समाधानकारक जागावाटप होत नसल्याचा ठपका ठेवून स्वबळावर निवडणुका लढवल्या. हा आघाडीला पहिला धक्का होता.

पुढे पुरोगामी विचारांच्या माकप, भाकप  जनता दल, शेकाप, आंबेडकरवादी संघटना यांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी डाव्या पक्षांनी उमेदवार उभे केले. उर्वरित ठिकाणी भाजप – शिवसेनेला विरोध म्हणून उभय कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार डाव्या पक्षांनी उमेदवारांशी संपर्क साधला. मात्र त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, उलट त्यांना चार हात दूर ठेवण्याची भूमिका दोन्ही कॉंग्रेसने घेतली असल्याचा आरोप होऊ लागला आहे. कोल्हापूर आणि बेळगाव मध्ये कटू अनुभव आल्याचे निवडणुकीनंतर होऊ लागलेल्या विश्लेषण कार्यRमातून डाव्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते जाहीरपणे बोलून दाखवत आहेत.

नको बाबा डाव्यांची संगत

कोल्हापुरात महाआघाडी कडून राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक हे उमेदवार होते. तर बेळगाव मध्ये काँग्रेसचे डॉ. वीरुपाक्ष साधुण्णावर उमेदवार होते. आघाडीधर्म निभावण्याच्या हेतूने डाव्या पक्षाच्या प्रमुखांनी दोन्ही उमेदवारांशी संपर्क साधून विनाअपेक्षा पाठिंबा देण्याची भूमिका सांगितली. त्यासाठी पक्षाच्या कार्यालयात पाचारण केले. बैठक झाली, पण प्रचारात सामावून घेण्याबाबत अपेक्षित प्रतिसाद उमेदवारांनी दिला नाही, असे डाव्या पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यांची कारणमीमांसा ते करतात, ‘कोल्हापुरात महाडिक यांची भाजप आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जवळीक राहिली. प्रचार सभा वेळी डाव्यांनी मोदी, पाटील यांच्यावर हल्ला चढवला तर ते मतदारांना रुचणार नाही,’ असा सल्ला काहींनी उमेदवारांना दिला. परिणामी उमेदवारांनी डाव्यांना प्रतिसाद दिला नाही. काही सभावेळी डाव्यांनीच स्वत:हून शिरकाव करून पाठिंबा देणारी भूमिका मांडली. बेळगावात तर उमेदवाराचे सुपुत्र माकपच्या बैठकीला आले. पण, त्यानंतर त्यांनी पाठ फिरवली ती कायमची.

कोती प्रवृत्ती नडली

‘कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रचाराला मदत करण्याची आणि त्यायोगे आम्हाला मानणारा वर्ग मतदानासाठी प्रवृत्त करण्यास तयार असताना कोत्या प्रवृतीने डाव्यांना दूर ठेवले, असे भाकपचे कोल्हापूर शहर सचिव रघुनाथ कांबळे यांनी सोमवारी ‘लोकसत्ता‘ला सांगितले. ‘उभय काँग्रेसला भांडवलदारांकडून मदत मिळत असते. डावे नेहमीच आRमकपणे उजव्यांच्या विरोधात असतात. मात्र भांडवलदारांच्या सल्लय़ाने कॉंग्रेसने डाव्यांना बाजूला सारले आहे,’ असा आरोप कांबळे यांनी केला. विशेष म्हणजे गवई, कवाडे, दलित महासंघ या  आंबेडकरवादी संघटनेच्या प्रमुखांना प्रचारात विशेष स्थान दिले असल्याचेही दिसून आले. तर, जनता दलाचे ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ झाल्याची चर्चा गडहिंगलज परिसरात उघडपणे सुरु आहे.