|| दयानंद लिपारे

कोल्हापूर, इचलकरंजीत मंदीसह महापुराच्या फटक्याने अर्थकारण संकटात

मंदीच्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्य़ातील इंजिनीयिरग फौंड्री उद्योगाची धग थंडावली आहे. तसेच वस्त्रनगरी इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसायाचा खडखडाट शांत झाला आहे. फौंड्री ३५ ते ४० टक्के काम कमी झाले आहे. यापूर्वी दिलेल्या ऑर्डरमध्ये पुन्हा कपात केली जात असल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आठवडय़ातील तीन दिवस उद्योग बंद ठेवावा लागत कामगारांपुढे रोजगाराचा मुद्दा आहे. इचलकरंजीतील यंत्रमागांपकी ४० हजार यंत्रमाग ५० टक्के काम करीत असून १० हजार माग पूर्णत बंद आहेत. जिल्ह्य़ात कोल्हापूर, इचलकरंजी, हातकणंगले, जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये इंजिनीयिरग फौंड्री उद्योगाने पंख विस्तारले. या भागात प्रामुख्याने बडय़ा वाहन कंपन्यांसाठी लागणारे सुट्टे भाग, मशीन टूल्स, सिलिंडर हेड, सिलिंडर ब्लॉक, पिस्टन, ब्रेक ड्रम, क्लच आदी बनवले जात आहे. याशिवाय, साखर, पंप, व्हॉल्व्ह, गृहोपयोगी वस्तूंचे भाग तयार केले जातात. कोल्हापूर जिल्ह्य़ात फौंड्रीचे सुमारे २०० उद्योग असून ५० हजार कामगारांना थेट तर तितक्याच जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला होता.

दोन वर्षे मागणी घटलेलीच

फौंड्री उद्योगात बडय़ा कंपन्या २५ तारखेला पुढील महिन्यात किती काम (सुटे भाग बनवायचे) याची ऑर्डर आणि पुढील दोन महिन्यांची साधारण ऑर्डर याची लेखी स्वरूपात कळवत असत. आता ही ऑर्डर महिना उजाडला तरी निश्चितपणे कळवली जात नाही. उशिराने कळवली तरी नंतर कधीही त्यात कपात करा, अशी सूचना करणारा खलिता पोहचतो. यामुळे महिन्यात काम किती करायचे आणि किती कामगारांना कामावर बोलावयाचे याचा पेच उद्योजकांना पडला आहे. फौंड्रीमधील कामात ३५ ते ४० टक्के कपात झाली आहे. सर्वच कंपन्यांनी आठवड्यातील दोन दिवस काम बंद ठेवले असून अलीकडेच काहींनी तीन दिवस काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बहुतेक कंत्राटी कामगार हे बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड राज्यांतील आहेत. आठवडय़ातील निम्मे दिवस काम असल्याने या परप्रांतीय कामगारांनी मूळ गावाकडे मोर्चा वळवला आहे. आता दसरा-दिवाळीनंतरच ते परतण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागातील कामगारांनाही पुरेशा कामाअभावी आठवडाभर काम देता येत नाही. तीन दिवस काम बंद ठेवावे लागत आहे, असे हातकणंगलेतील लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष, हायटेक बॅलॅन्सींग कंपनीचे अध्यक्ष अनिल कुडचे यांनी सांगितले. या औद्योगिक वसाहतीमध्ये तीन कापड प्रक्रिया गृह (प्रोसेसर्स) आहेत. त्यांची पाणी मागणी तीन लाख लिटर असायची आता ती दीड लाखांवर आली आहे. यातून कापड व्यवसायावर किती परिणाम झाला आहे हे काढता येते.

मोठा काळ मंदीचा कटू अनुभव इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय अनुभवत आहे. वीज दर सवलतीचा अल्पसा लाभ झाला. मात्र सूत आणि कापड यांचे दर कमी होऊनही उत्पादित कापडाला उठाव नाही. विक्री केलेल्या कापडाची देयके खूप उशिराने मिळत आहेत. पूर्वी सव्वा लाख यंत्रमाग होते, त्यातील २५ हजार माग भंगारात विकले गेले. एक लाखापकी निम्मे माग रात्रपाळीत सुरू असतात. त्यांचे अध्रे उत्पादन घटले आहे. अत्याधुनिक स्वयंचलित मागाचा वीज दर इतका वाढला आहे की त्यांचे अर्थकारण ढासळले आहे          -विनय महाजन, अध्यक्ष, जागृती यंत्रमागधारक जागृती संघटना

मंदीचा तडाखा बसला असल्याने नव्या उद्योगाला सोडाच जुन्या उद्योगाला निम्मेच काम मिळत आहे. नव्याने सुरू केलेले सुमारे ५०० कोटींचे उद्योग धूळ खात आहेत. त्यांच्या कर्जाचे व्याजही भरणे अशक्य झाले असल्याने शासनाने सवलत देण्याची नितांत गरज आहे. आधीच मंदी असताना महापुराचा मोठा फटका बसला असल्याने त्यातून उद्योग सावरायला बराच वेळ घालवावा लागेल.  – सुमित चौगुले, अध्यक्ष, दि इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन, कोल्हापूर विभाग

  • आकडय़ांमध्ये फौंड्री उद्योग कोल्हापूर जिल्ह्य़ातील फौंड्री उद्योग – २००
  • वार्षकि उलाढाल – १० हजार कोटी रुपये.
  • दरमहा उत्पादन – ७० हजार टन.
  • प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कामगार – १ लाख