श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात सरकारी पुजारी नियुक्तीला बुधवारी सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी ४ महिलांसह २६ इच्छुक उमेदवारांना देवस्थान समितीच्यावतीने मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते. येत्या तीन दिवसांत ८१ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचा अहवाल राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला पाठवण्यात येणार आहे.

महालक्ष्मी मंदिरात पंढरपूरच्या धर्तीवर या मंदिरात सरकारी पुजारी नियुक्त करण्यात यावे अशी मागणी झाली. आंदोलनानंतर शासनाने त्याला वर्षभरापूर्वी मान्यता दिली. त्यानुसार पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया आजपासून सुरू  झाली. देवस्थान समितीकडे ४ महिलांसह  २५२ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. त्यांची छाननी केली असता ८१ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.

या मुलाखती टेंबलाई टेकडीवरील देवस्थान समितीच्या यात्री निवासमध्ये होत आहेत. आज पहिल्या दिवशी २६ उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सहाय्यक सचिव शिवाजीराव साळवी, समिती सदस्या संगीता खाडे, वैशाली क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, सुभाष वोरा, वेदशास्त्र संपन्न विकास जोशी, कृष्णानंद शास्त्री यांची निवड समिती इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत.