महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक आता कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. तब्बल अडीच हजार कोटींची उलाढाल, बारा लाख लिटर दूध संकलन यामुळे ‘गोकुळ’वर वर्चस्व मिळवणे हे कोल्हापूर जिल्ह्य़ातील प्रत्येक नेत्याचे स्वप्न असते. गोकुळचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील या जोडगोळीने ‘गोकुळ’वर गेली तीन दशके वर्चस्व ठेवले. त्याला धक्का देण्याच्या हालचाली राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहेत. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील या नवनिर्वाचित मंत्र्यांनी खासदार संजय मंडलिक यांच्या सहाय्याने ‘गोकुळ’ ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील सर्वात मोठा दूध संघ अशी गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध संघाची ओळख. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात दूध विक्रीत गोकुळ आघाडीवर आहे. २५०० कोटी रुपयांची उलाढाल असल्याने या संस्थेचा संचालक होण्यासाठी राजकीय नेत्यांचा आटापिटा सुरू असतो. गेल्या निवडणुकी वेळी महाडिक-पाटील यांच्या सत्तारूढ आघाडीला मुश्रीफ, पाटील, मंडलिक आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी कडवे आव्हान दिले. मात्र त्यांना थोडक्या मतांनी पराभूत व्हावे लागले. या पराभवापासून खचून न जाता पुढील निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने त्यांची पावले पडत गेली.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर कोल्हापुरातील सत्तास्थाने काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद, हातकणंगले व चंदगड नगर परिषद येथे एकतर्फी विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता या नेत्यांचे लक्ष गोकुळवर केंद्रित झाले आहे. थेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रभाव भक्कम करण्याच्या हालचाली पडद्याआड सुरू आहेत. त्याशिवाय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकरवी चर्चा घडवून आणून पी. एन. पाटील यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न महाआघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे.

गोकुळच्या बदल्यात जिल्हा बँक?

गोकुळ दूध संघ निवडणूकसाठी मदत करावी, असा प्रस्ताव महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांना दिला आहे. त्यासाठी मुश्रीफ यांच्या ताब्यातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करू, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र हे साटेलोटे मुश्रीफ यांना मान्य नाही. त्यांनी मंडलिक, सतेज पाटील यांच्यासह गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत महाडिक हे पी. एन. पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊन गोकुळवरील आपले वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.