18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

राजकीय लढ्याचा खरा कस हातकणंगले मतदार संघात

शेट्टींना गल्लीतच रोखण्याचा डाव

दयानंद लिपारे , कोल्हापूर | Updated: August 11, 2017 1:43 AM

गळ्यात गळा  घालणारे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात कायमचे अंतर पडल्याने आता ते एकमेकांवर वार  करण्यास सज्ज झाल्याने दोन शेतकरी नेत्यांतील राजकीय संघर्ष लक्ष्यभेदी ठरणार आहे . त्यांच्यातील राजकीय लढ्याचा खरा कस शेट्टी – खोत यांचे मूळचे कार्यक्षेत्र असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात लागणार आहे . एकमेकांची जिरवण्याच्या राजकीय खेळींना आता ऊत येण्याची चिन्हे आहेत.

ज़िल्हा परिषदेच्या निवडणुकीतील ’अडवा आणि जिरवा ’ या धोरणाचा फटका बसलेले सदाभाऊ आता भाजपच्या वळचणीला गेले आहेत . भाजपच्या मदतीआधारे शेट्टी यांना मात  देण्याचा डाव रचला जाणार , हे उघड . एकदा गल्लीत जिरली कि दिल्लीत पोहचण्याची काय बिशाद ,अशी चाल खेळली जाणार आहे . याउलट सदाभाऊ यांची जनमानसातील ताकद काय हे दाखवून उघडे पाडण्याचे डावपेच स्वाभिमानीच्या छावणीत रचले जात आहेत . लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत जाईल तसतसे या  निमित्ताने राजकारणाचा हा नवा सारीपाट आकाराला येत जाईल .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दोघा  मित्रांच्या मत्रीच्या कथा आजवर खूप ऐकवल्या गेल्या . निष्कांचन अवस्थेतही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी तत्कालीन सत्ताधारी , साखर सम्राट यांना जेरीला आणल्याचा  कहाण्या आता अनेकदा वाचून – ऐकून  झाल्या . केंद्रात आणि राज्यात सत्तांतर करण्यासाठी आपल्यापरीने योगदान देणारया या मित्रांची राजकीय सोयही झाली . शेट्टी खासदार व खोत मंत्री झाले . पुढे खोत यांचे मंत्रिपदाच मत्रीच्या ठिकर्या उडवण्यास कारणीभूत ठरले .  शेट्टी – खोत यांचा दोस्ताना आता दुष्मनीत बदलला आहे . केवळ बदलला आहे असे नव्हे तर एकमेकांचे उट्टे काढण्याचे राजकारण नजीकच्या काळात वाढीस लागणार आहे. त्याचे पहिले मोठे कुरुक्षेत्र  हातकणंगले लोकसभा मतदारसंघ असणार आहे .

शेट्टींना गल्लीतच रोखण्याचा डाव

सत्ता केंद्रातील असो कि राज्यातील राजू शेट्टी सत्तेचे वाटेकरी आहेत . पण गेल्या वर्षभरापासून त्यांनी मोदींपासून ते फडणवीसपर्यंत जाहीरपणे टीकेची तोफ डागण्यास सुरुवात केली आहे . यामुळे शेट्टी यांच्यावर सत्ताधारी थेटपणे टीका करण्याचे टाळत  असले तरी त्यांचा समाज माध्यमाचा चमू शेट्टींचे वाभाडे काढताना दिसत आहे . याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत  शेट्टी यांना दिल्लीला पाठवण्याऐवजी गल्लीतच मार्ग रोखण्याची खेळी रचली जाणार . अशावेळी शेट्टी यांना नामोहरण करण्यासाठी खोत यांच्या बुलंदी टीकेची तोफ कामी येणार आहे . शेट्टी यांचा सहवासात राहिल्यानंतर त्यांचे दोष हे खोत यांना माहिती आहे . या माहितीच्या आधारे शेट्टी यांची प्रतिमा मलीन केली जावू शकते . सध्या सत्ताधारी पक्षाचे उघड वाभाडे काढणारे विरोधक हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत . त्यात शेट्टी यांचा क्रम वरचा आहे .हि बाब  भाजपला पचनी पडणारी नसल्याने लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांना रोखण्यासाठी भाजप व मित्रपक्षांची पुरेपूर ताकद वापरली जाण्याची चिन्हे आहेत .

खोत यांना अनुल्लेखाने टिपणार

शेट्टी यांच्या विरोधात सदाभाऊंची उखळी तोफ धडाडणार असली तरी ते शेट्टी यांच्याच पथ्यावर पडेल , असा सूर स्वाभिमानीतून व्यक्त होत आहे . खोत  यांच्याकडे वक्तृत्व असले तरी जनाधार नाही . हे बागणी  जिल्हा परिषदेत मंत्रीपुत्राच्या पराभवातून दिसले आहे . त्यामुळे त्यांनी टीकेचा मारा वाढवला तरी शेट्टी यांची प्रतिमा मालिन होण्याऐवजी सहानुभूती मिळेल, असे स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी ’लोकसत्ता’ला  गुरुवारी सांगितले . गेल्या निवडणुकीत सारे सहकार सम्राट एका सुरात  शेट्टी यांच्या विरोधात टीका करीत होते पण शेतकरी चळवळीला  वाहून घेतलेल्या शेट्टी यांचाच विजय झाला हे नाकारता कसे  येईल, याकडे त्यांनी लक्ष  वेधले . मुळात स्वाभिमानाने खोत यांना महत्व न देता अनुल्लेखाने मारण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले .

मंत्रिपदाला आव्हान?

गेल्या आठवड्यात शेट्टी यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली . त्यात नेमके काय घडले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून काही मुद्देही पुढे आले आहेत . स्वाभिमानीने शेट्टी – खोत वाद वाढू लागल्यावर  खोत यांच्या मंत्रिपदाला  आव्हान दिले होते . हा मुद्दा भाजपाला विचार करायला लावणारा आहे .  जनाधार असणारया शेट्टी यांना जवळ करायचे कि बुलंदी मारा करणारया खोत यांनी कंपूत ठेवायचे हा हि भाजपाला प्रश्न पडू शकतो . यातून थेट खोत यांच्या मंत्रिपदाचा हात घालण्याची खेळी स्वाभिमानीकडून रचली जाऊ शकते.

First Published on August 11, 2017 1:42 am

Web Title: raju shetti vs sadabhau khot at kolhapur