News Flash

राजकारणातून निवृत्त होऊ मात्र महाडिक गटाशी युती यापुढे नाही

पी. एन. पाटील यांच्यावरही सतेज पाटील यांनी निशाणा साधला.

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलाताना आमदार सतेज पाटील. समोर उपस्थित जनसमुदाय. (छाया -  राज मकानदार) 

 

सतेज पाटील यांचे टीकास्त्र

एक वेळ राजकारणातून निवृत्त होऊ मात्र महाडिक गटाशी युती करणार नाही. एक वेळ केलेली चूक परत करणार नाही असे स्पष्ट मत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती दक्षिण सभा मतदार संघाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. लोकसभेच्या वेळची चूक परत कधीही करणार नाही. महाडिक नाव आमच्या डिक्सनरीतून केव्हाच काढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्यात सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघात एकत्रित असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक व  जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन.पाटील या दोघांवर वाग्बाण सोडल्याने काँग्रेस अंतर्गत धुसफूस निवडणुकीच्या उंबरठ्यावर उघड झाली आहे.

दक्षिण मतदार संघातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येथील ड्रीम वर्ल्ड सांस्कृतिक हॉलमध्ये करण्यात आले होते. मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी मार्मिक लक्षवेधक अशा सूचना सुरुवातीला मांडल्या होत्या.

पी. एन. पाटील यांच्यावरही सतेज पाटील यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, आगामी निवडणुकीत ताराराणी आघाडीशी युती होईल, असे पी. एन. पाटील म्हणतात. तथापि ताराराणी आघाडी महापालिका व नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसविरोधात लढली, त्या ताराराणी आघाडीला काँग्रेसबरोबर घेण्याची चूक आम्ही कधीच करणार नाही. हवे तर करवीर मतदारसंघात पी. एन. पाटील यांनी महाडिकांच्या ताराराणीशी आघाडी करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

आमदार पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. महाडिकांनी आपण भाजपबरोबर आहे की काँग्रेसबरोबर याचे स्पष्टीकरण करावे. त्यांनी सगळीकडेच द्रोण लावून ठेवला आहे. दोन वर्षांनंतर सत्तापालट होऊन पुन्हा सत्ता काँग्रेसचीच येणार असल्याने त्यांनी आतापासूनच नंबर लावून ठेवला आहे. काँग्रेसशी जवळीकता वाढवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

सतेज पाटलांना सुनावले

आमदार सतेज पाटील यांच्याकडून झालेल्या काही चुकाही कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे मांडल्या. मंत्री असताना त्यांना कार्यकर्त्यांचा विसर पडला, असे अशोक पाटील (कावणे) यांनी ऐकवले. जयवंत घाटगे यांनीही ‘तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही; पण, कार्यकर्त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही कार्यकर्त्यांमध्येच राहा’ , असे त्यांनी सांगताच अन्य कार्यकर्त्यांनी त्यास दाद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:06 am

Web Title: satej patil slam on mahadevrao mahadik
Next Stories
1 सेंद्रिय शेतीला महत्त्व देण्यासाठी ५९७ कोटी खर्चाची तरतूद
2 नगरसेवक-अधिकारी यांच्यातील संघर्षांचे आणखी एक प्रकरण
3 निवडणूक आयोगाच्या घोषणेपूर्वीच मंत्र्यांकडून निवडणुकांचा अंदाज
Just Now!
X