न्यायालयाची आंदोलकांना सक्त ताकीद

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील टोल आंदोलनातील दावा प्रकरणी सोमवारी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असताना उपस्थित असणाऱ्या संशयित आरोपींना इतर आरोपी सुनावणीला हजर का राहत नाहीत, असा प्रश्न निर्माण केला. माझ्यासमोर येणारे सर्व आरोपी हे कुठल्याही पदावरील असले तरी ते माझ्यासाठी आरोपीच असतील. १९ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींनी माझ्या समोर हजर राहणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही आरोपी गैरहजर राहिल्यास हजर असणारे तसेच हजर नसणारे अशा सर्व आरोपी मी तुरुंगामध्ये पाठवेन अशी सक्त ताकीद दिली आहे, अशी माहिती याप्रकरणातील संशयित आरोपी दिलीप देसाई यांनी दिली.

न्यायालतील हा घटनाक्रम उधृत करून देसाई यांनी  ‘टोल आंदोलनातील सर्व कार्यकर्त्यांना या पूर्वी सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी दिलेली आश्वासने ही ग्रहित न धरता १९ तारखेला सर्वानी न्याय देवतेचा आदर ठेऊन न्यालयालात हजर राहावे, अशी कळकळीची विनंती समाज माध्यमाद्वारे केली आहे.

शासन निर्णय अर्ध्यातच

कोल्हापुरातील टोल माफ झाल्यावर मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार शहरात झाला होता. त्यावेळी ‘टोलचे आंदोलन हे राजकीय असल्यामुळे कार्यकर्त्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे काढून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, हा निर्णय शासकीय पातळीवर रेंगाळला आहे. त्यामुळे जून महिन्यात देसाई यांच्यासह टोल आंदोलक फडणवीस यांना विमानतळावर भेटले होते. तेव्हा फडणवीस यांनी ‘खटले मागे घेण्याची अंमलबजावणी का झाली नाही हे मी तपासून घेतो आणि संबंधितांना तशा सूचना देतो, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यसमोर आश्वासित केले होते. अजूनही शासन निर्णय लटकलेला असून न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु असून संशयित आरोपीमध्ये काही आजी, माजी आमदारांसह मान्यवरांचा समावेश आहे. त्यांना आता न्यायालयासमोर उपस्थित राहणे बंधनकारक बनले आहे.