News Flash

दुष्काळग्रस्तांचे कष्ट दूर करण्यासाठी पाणी गाडय़ाची निर्मिती

कोल्हापूरच्या ‘उडान फाउंडेशन’कडून ३ हजार पाणीगाडय़ांचे वाटप

कोल्हापुरातील ‘उडान फाउंडेशन’तर्फे दुष्काळग्रस्त कु टुंबाना वाटप केलेला पाणी गाडा.

कोल्हापूरच्या ‘उडान फाउंडेशन’कडून ३ हजार पाणीगाडय़ांचे वाटप

दयानंद लिपारे, कोल्हापूर

राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची दाहकता वाढत असताना हे पाणी मिळवून ते घरापर्यंत आणण्याचे कामही दिवसेंदिवस कष्टप्रद होत चालले आहे. अशा दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याच्या हेतूने ‘नीलकमल ग्रुप’ या उद्योगाकडून अभिनव ‘पाणीगाडय़ाची’(‘गाडा’ स्वरूपातील पाण्याच्या ‘कॅन’) निर्मिती करण्यात आली असून येथील सामाजिक संस्था असलेल्या ‘उडान फाउंडेशन’तर्फे राज्यात अशा ३ हजार पाणीगाडय़ांचे वाटप करण्यात आले आहे.

‘उडान फाउंडेशन’तर्फे कोल्हापूर शहरातील बेवारस, मनोरुग्ण यांचे पुनर्वसन करण्याचे काम केले जाते. याच सामाजिक जाणिवेतून पाणी टंचाई त्यातून दुष्काळग्रस्त कुटुंबातील महिलांचे होणारे शारीरिक हाल संपुष्टात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. या दरम्यान त्यांना या आगळय़ा-वेगळय़ा पाणी गाडय़ाची माहिती समजली. यावर संस्थेने २५ लाख रुपयांचा निधी उभा करून त्यातून राज्याच्या दुर्गम भागातील तीन हजार कुटुंबांना नुकतेच या गाडय़ांचे वाटप केले.

ही पाणी गाडा संकल्पना दुष्काळग्रस्तांचे कष्ट दूर करण्यासाठी अमलात आणण्याचा निर्धार ‘उडान’च्या कार्यकर्त्यांंनी केला. त्यांनी मदतीचे आवाहन केल्यावर पुण्यातील दोन प्रमुख दात्यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली. मदतीचे अनेक हात पुढे आले. निधीची तरतूद झाल्यावर संयोजकांनी समाज माध्यमातून नि:शुल्क पाणी गाडा देणार असल्याचा संदेश दिला. त्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानुसार गरजूंची यादी तयार करण्यात आली.   १३ ते १५ एप्रिल या कालावधीत नांदेड, बीड , धुळे , यवतमाळ, बुलढाणा, नाशिक आदी जिल्ह्यात जाऊ न सुमारे तीन हजार कुटुंबाना या पाणी गाडय़ाचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमात चेतन घाटगे, रोहन माने, वंदना जाधव, ललिता गांधी, मोनिका ताम्हणकर, अरविंद व्हटकर, मनीषा घाटगे, पूनम जाधव, माधुरी पाटील, राखी कांबळे आदींचा समावेश होता.

दुष्काळी भागातून या पाणी गाडय़ांना मोठी मागणी आहे. शिवाय, कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी दोन—तीन किमीवरून पाणी वाहून आणावे लागते. निधी उपलब्ध होताच त्यांनाही हे पाणी गाडे देण्याचा विचार असल्याचे लाड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

..असा आहे पाणीगाडा

या संकल्पनेविषयी ‘उडान’चे प्रमुख भूषण लाड यांनी सांगितले, की पुण्यातील ‘नीलकमल ग्रुप’ने एक सर्वेक्षण केले असता त्यांना असे आढळून आले की खेडय़ातील ७० टक्के स्त्रियांचा दिवसातील ४ तासांचा वेळ हा केवळ पाणी भरण्यात जातो. सरासरी दोन किलोमीटर अंतरावरून हे पाणी त्यांना आणावे लागते. एवढे कष्ट उपसूनही एकावेळी केवळ दहा लिटर पाणी मावणारे दोन हंडे वाहून आणले जातात. मग उर्वरित पाण्यासाठी पुन्हा ही पायपीट सुरू राहते. हे सारे कष्टप्रद जगणे संपावे यासाठी गेल्याकाही दिवसांपासून संस्थेकडून प्रयत्न सुरू होते. यावर उपाय म्हणून ‘नीलकमल ग्रुप’ने अभिनव अशा ‘गाडा’ स्वरूपातील पाण्याच्या ‘कॅन’ची निर्मिती केली आहे. पाणी भरून झाल्यावर त्याला लोखंडी आकडा लावायचा आणि त्यावर हा ड्रम जमिनीवरून सहजरीत्या फिरवत घरी नेता येतो. हा ड्रम ने-आण करणे सोपे तर आहेच, शिवाय त्यामध्ये तब्बल ४५ लिटर पाणी मावण्याची सुविधा आहे. यामुळे आता कमी कष्टात जास्त पाण्याची वाहतूक करणे सोपे बनले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2019 2:49 am

Web Title: water vehicles develop for drought victim from udaan foundation
Next Stories
1 खासदार संभाजीराजेंनी तरुणांसोबत नदीत लुटला पोहण्याचा आनंद
2 अंमलबजावणी तारीख निश्चित होईपर्यंत श्रीपुजकांच्या कामात अडथळा आणू नये
3 कोल्हापुरात महिला आयपीएसवर रोखले पिस्तूल; माजी उपमहापौर पतीच्या मटका अड्ड्यावर छापा
Just Now!
X