कोल्हापूर : सुदान देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५० जण अडकले आहेत. त्यांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाशी तातडीने संपर्क साधला आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी सांगितले. सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष आहे. नोकरीच्या निमित्ताने सुदानमध्ये गेलेले कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतील ७ जणांसह ५० लोकांचा समावेश आहे. हे सर्वजण तेथील कॅनोन शुगर कंपनीत नोकरीस आहेत. संजय बाबासाहेब बिरणगट्टी या युवकाशी आज आमदार आवाडे यांनी दूरध्वनीद्वारे तेथील माहिती जाणून घेतील. ते भारतीय राजदुतावास कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत असले तरी संपर्क होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुदान देशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी अंतर्गत मोहिमेच्या माध्यमातून आवाडे प्रयत्नशील आहेत. इचलकरंजी मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील संबंधित नागरिकांचे पासपोर्ट क्रमांक आणि इतर माहिती घेऊन पुढील कार्यवाही जलद गतीने होऊन लवकरात लवकर सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी मदत करावी असे पत्रसुध्दा केंद्रीय रस्ते वाहतूक व आमदार आवाडे यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांनी दिले आहे.

प्रशासन अनभिज्ञ?

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ५० लोक सुदानमध्ये अडकून पडले आहे. अडकलेले लोक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून सुटकसाठी आटापिटा करीत आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात लोक अडकले असताना त्याचा सुगावा का नसावा? याची चर्चा होत आहे.