कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रखडलेले रस्ते दुरुस्तीची कामे आणि दुसरीकडे खराब रस्त्यांमुळे सर्वत्र पसरलेले धुळीचे साम्राज्य याचा नागरिकांना उपद्रव होत असल्याने आम आदमी पक्षाने महापालिकेच्या दारात धूळ फेकून निषेध नोंदवला.शहरभर पडलेल्या खड्ड्यांमुळे हवेत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. नाका-तोंडात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत. धुळीच्या त्रासाने वाहनचालकांना तोंडाला मुखपट्टी लावून फिरायची वेळ आली आहे.याला विरोध म्हणून रस्त्यावर पसरलेली खरमाती महापालिकेच्या दारात ओतत आपने धुळीच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन केले. पावसाळ्यात मुरूम टाकून केलेली तात्पुरती डागडुजी, पावसाने वाहून आलेली माती, काहीच दिवसात उखडलेले पॅचवर्क यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी,उषा वडर, विजय हेगडे, संजय नलवडे, उमेश वडर, अमरसिंह दळवी, मयुर भोसले, महमदशरीफ काझी, रवींद्र राऊत, दिलीप पाटील, रमेश कोळी, लाला बिर्जे, चेतन चौगुले, शशांक लोखंडे आदी उपस्थित होते.

केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून गेल्या दोन वर्षात अठरा कोटी रुपये खर्च झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनसुद्धा शहरातील धुळीचा प्रश्न गंभीर होत आहे. चौका-चौकात लावलेले धुक्याचे टॉवर बंद आहेत. हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने धुके पसरविणारे यंत्र नेमके कुठे वापरले जाते याचे उत्तर अधिकारी देतील का, असा प्रश्न आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी यावेळी केला.

शहरातील काही किलोमीटरचे रस्ते सोडल्यास कोल्हापुरातील शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरांमधील रस्ते त्याचबरोबर नव्याने वाढलेल्या वसाहतींमध्ये सुद्धा एकही शहराच्या दर्जाचा रस्ता राहिलेला नाही. पाणंदी सुद्धा इतक्या भयंकर नसतात, अशी स्थिती झाली आहे. इतकेच नव्हे तर मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या १०० कोटींच्या रस्ते प्रकल्पातील रस्ते सुद्धा अवघ्या काही महिन्यांमध्ये उखडण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील रस्त्यांची दुरवस्था इतकी गंभीर आहे की प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. वाहतूक कोंडी तर नित्य नियमाचा विषय झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या नशिबी चांगले रस्ते मिळणार तरी कधी? असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.