कोल्हापूर : कोल्हापुरातील चाळण झालेल्या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे उपरोधित आंदोलन काल केल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या सुस्त प्रशासनाला आज जाग आली. आंदोलन झालेल्या नाना पाटील जरगनगर ते कळंबा या मार्गावर रस्ता कामाला सुरुवात झाल्याने रस्ता चमकू लागला आहे.

 कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी दुरवस्था असल्याने पादचारी, वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या प्रश्नी काल ठाकरे सेनेने चिवा  बाजार परिसरात खड्ड्यात बैठक आंदोलन करून महापालिकेच्या रस्ता कामांचा पंचनामा केला होता. पालकमंत्री रस्त्याचा निधी कुठे मुरतो याचा खुलासा करावा, अशी विचारणा करताना महापालिकेच्या निष्क्रिय प्रशासनावर टीकेची झोड उठवली होती.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कोल्हापुरात, हातकणंगले मतदारसंघासाठी लक्ष घातले

 या आंदोलनाची दखल घेऊन आज नाना पाटील नगर ते कळंबा या मार्गावर पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. सकाळपासून महापालिकेची  रस्ते कामाची यंत्रणा येथे कामाला लागली. या भागातील रस्त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्याने नागरिकांना किमान दिलासा मिळत आहे, असे उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे  यांनी सांगितले.