कोल्हापूर : महादेवी हत्ती परत मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर त्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी स्वागत केले आहे. याचबरोबर हत्ती लवकर आणण्यासाठी शासनाने गतीने क्रियाशील पावले टाकण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्ती वनतारा संग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. तो परत मिळण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक झाली.
या बैठकीनंतर बोलताना नांदणी मठाचे मठाधीश स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा मार्ग रास्त आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या महाधिवक्त्यांशी आमचे वकील उद्या चर्चा करणार आहेत. हत्ती परत येण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय, अन्य सुविधा मठांमध्ये देण्याची आमची सदैव तयारी आहे.
महादेवी हत्ती संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात काही तरतुदी असल्याने तेथे जाण्यावाचून पर्याय नाही. राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असा उल्लेख करून काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सांगितले, की नांदणी मठ संस्थान सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तेथे राज्य शासनाने सकारात्मक बाजू मांडली पाहिजे. तरच महादेवी हत्ती परत मिळणार आहे. आमदार राहुल आवाडे म्हणाले, की महादेवी ही काेल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे. स्थानिक जनभावना व धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन तिला परत आणण्याची शक्यता असल्याने शासनाने यामध्ये लक्ष घालून पुढे जाण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे.’
विटा येथील श्रीनाथ मठाचा हत्ती २०२३ साली वनतारा येथे घेऊन गेले आहेत. आज तो हत्ती तिथे आहे की नाही याबाबत संशय निर्माण झालेला आहे, अशी भीती व्यक्त करून माजी खासदार राजू शेट्टी यांनी हत्ती हे ‘अनुसूची १’ म्हणजेच डोंगरी व पाळीव हत्ती या दोन प्रकारांत मोडतात. पाळीव हत्तीबाबत राज्य शासनाने स्वतंत्रपणे कायदा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शासकीय निर्णयाचे स्वागत
सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा मार्ग रास्त आहे. याचे आम्ही स्वागत करतो. या संदर्भात राज्य शासनाच्या महाधिवक्त्यांशी आमचे वकील उद्या चर्चा करणार आहेत. हत्ती परत येण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय, अन्य सुविधा मठांमध्ये देण्याची आमची सदैव तयारी आहे असल्याचे नांदणी मठाचे मठाधीश स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी सांगितले.