कोल्हापूर : ‘गोकुळ’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा महाब्रँड आहे. परंतु प्रसंगी तोटा सहन करून ‘अमूल’ दूध संघ गोकुळ ब्रँडला मोडायचे आक्रमक कारस्थान करीत आहे, असा आरोप वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी  सोमवारी  केला. अशा परिस्थितीत गोकुळचे वैभव टिकवसाठी म्हशीच्या दुधात पाच लाख लिटर वाढ करण्याची शपथ घेऊया, असे आवाहनही त्यांनी केले.

व्हन्नूर (ता. कागल) येथे श्री. हनुमान दूध संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे होते. मुश्रीफ म्हणाले, गोकुळ म्हशीच्या दुधाला पुणे, मुंबईसह महाराष्ट्रभर मोठी मागणी असल्याने एक हजार निवडक शेतकरी शोधून, त्यांना प्रत्येकी दहा म्हशींसाठी अर्थपुरवठा करावयाचा व अनुषंगिक सेवा सुविधा द्याव्यात अशी सूचना मी संचालक मंडळाला केली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांना फटकारले

दरम्यान, गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा होऊन चार दिवस उलटले तरी वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. याच मुद्द्यवरून मंत्री मुश्रीफ यांनी विरोधकांना वार्षिक सभेतील घोषणाबाजी,गोंधळ यातून संघाची अब्रू राज्याच्या वेशीवर टांगणे आता बंद करा,अशा शब्दात फटकारले आहे. दूधधंदा आता दुय्यम राहिला नसून तो शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बनलेला आहे. गोकुळ ही सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांच्या, उत्पादकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी असते, याची जाणीव ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले.