कोल्हापूर : निधीसाठी आग्रह धरत असताना कामांचा दर्जा चांगला ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे याची जाणीव ठेवा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी लोक प्रतिनिधींचे काम टोचले. तर, कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित इमारतीचा आराखडा चांगल्या दर्जाचा तयार करून सादर करा, अशा शब्दांत अधिकार्‍यांना सुनावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मतदारसंघातील विकास कामांची यादी सादर करीत त्यासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली. हा संदर्भ घेऊन पवार यांनी विकास कामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी दिला जाईल, असे आश्वासित करत असतानाच निधीची मागणी करीत असताना कामांचा दर्जा चांगला राहील, यासाठी लोक प्रतिनिधींनी जागरूक राहून काम केले पाहिजे. झालेली विकास कामे अल्पावधीत खराब होतात याची जबाबदारी लोक प्रतिनिधींचीही आहे, याची जाणीव त्यांनी या वेळी करून दिली.

बैठकीत कोल्हापूर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, इचलकरंजी महापालिका यांच्याकडून विकास कामाबाबतचे सादरीकरण झाले. कोल्हापूर महापालिकेने प्रस्तावित इमारतीसाठी केलेले सादरीकरण पाहून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. चांगल्या पद्धतीचा, परिपूर्ण असा आराखडा सादर करण्याची सूचना करताना पवार यांनी नवीन कार्यालयासाठी दोनऐवजी पाच एकर जागा देण्याची सूचनाही जिल्हा प्रशासनाला केली.

कोल्हापूर महापालिका क्षेत्रात रस्ते अल्पावधीतच खराब झाल्याने मक्तेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी सूचना करताना पवार यांनी क्रीडा संकुलात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मक्तेदाराला एक पैसाही देणार असल्याचे निक्षून सांगितले. जिल्ह्याच्या विकासाची गती पाहता शेंडा पार्क येथील रिकामी जागा पुरणार नाही. त्यासाठी जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या जागांचा शोध घेण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली.

कोल्हापूर शहर ऐतिहासिक असून, येथील अनेक शासकिय इमारती जुन्या काळातील आहेत. त्या अधिक मजबूत कशा राहतील, तसेच नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतींची गुणवत्ता कशी वाढवता येईल, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. शहरातील सारथी अंतर्गत सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेताना, त्यासाठी उर्वरित आणि आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

केशवराव भोसले नाट्यगृहाशेजारील प्रस्तावित वाहन तळ आणि स्वच्छता गृहाच्या इमारतीसाठी तयार केलेला आराखडा सादर करण्यात आला. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, परंतु ऐतिहासिक नाट्यगृहाशेजारी बांधली जाणारी इमारत त्याला साजेशी असेल, असे डिझाइन तयार करावे, असे त्यांनी सांगितले. याबाबतचा आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या डिझाइनबाबतही चर्चा झाली. एकाच ठिकाणी पाच एकर जागेवर भव्य आणि सर्व सुविधांनी युक्त इमारत असावी. यासाठी स्पर्धा राबवून विविध पुरवठा दारांकडून डिझाइन्स मागवावीत आणि चांगले डिझाइन निवडून अंतिम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.