कोल्हापूर : भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे पहाटे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाने पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले.महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी यासाठी आयआरसीटीसीने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने ही विशेष सहल आयोजित केली आहे. सहा दिवसांच्या या प्रवासात पर्यटकांना रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळा किल्ल्यांसह निवडक धार्मिक स्थळांना भेटीची संधी मिळाली आहे. प्रवासादरम्यान निवास, प्रवास विमा, जेवण आणि पर्यटनस्थळी फिरण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे. या ट्रेनमध्ये ७०० जागांचे आरक्षण झाले आहे.

सहलीत आतापर्यंत पर्यटकांनी रायगड किल्ला, पुणे येथील लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि सातारा येथील प्रतापगड किल्ला पाहिला. आज कोल्हापूरात महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला भेट दिली.