दयानंद लिपारे

कोल्हापूर : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने सत्ताधारी – विरोधी पक्षातील राजकीय संघर्ष वाढीस लागला आहे. प्रचाराच्या मैदानात एकमेकांना आव्हान दिले जात असताना निवडणुकी आधी पहिली लढाई ही सोशल मीडियामध्ये जुंपण्याचे संकेत मिळू लागले आहेत. भाजपच्या जल्पक सेनेचा (ट्रोल आर्मी) मुकाबला करण्यासाठी विरोधकांनी सत्य सेनेद्वारे (ट्रुथ आर्मी) कडवे आव्हान उभे करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी २ लाख प्रचारकांची भरती केली जाणार आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकारिणीत २५ हजार फॉलोअर्स असल्याशिवाय पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगून समाज माध्यमात अधिक सतर्क होणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजकारण, निवडणुकीचे तंत्र अलीकडच्या काळामध्ये बदलत चालले आहे. आजही बैठका, मेळावे याद्वारे पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. मोठय़ा सभांतून लोकांना पक्षाची भूमिका पटवून दिली जात आहे. याच्या बरोबरीने आता समाज माध्यमाचे महत्त्वही वाढीस लागले आहे. विशेषत: स्मार्ट मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून समाज माध्यमाचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, यूटय़ुब आदी प्रकारच्या सोशल मीडियाचा कुशलतेने वापर करून घेतल्यास राजकीय ध्येय गाठणे सोपे असल्याचा निष्कर्ष राजकीय पक्षांनी मांडला आहे. त्या दृष्टीने पक्षांची नव्याने बांधणीही सुरू केली आहे.

 विरोधक सरसावले

 काँग्रेसप्रणीत सरकार सत्तेवरून हटवून दिल्लीवर झेंडा रोवणाऱ्या भाजपने समाज माध्यमाचा कुशलतेने वापर केला होता. ‘आप’सारख्या नवख्या पक्षाने याच तंत्राचा खुबीने वापर करून दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही सत्ता मिळवली आहे. तुलनेने राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष याबाबतीत बराचसा मागे राहिला होता. समाज माध्यमाचे महत्त्व पटल्याने आता काँग्रेसने आपल्याबरोबरच समविचारी पक्षांनाही एकत्रित करून सोशल मीडियाची लढाई लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियान अंतर्गत याचे पुढचे पाऊल टाकले असून सन २०२४ सालच्या निवडणुकीत भाजपबरोबर मुकाबला करण्यासाठी त्रिस्तरीय रणनीती आखली आहे. भाजपकडून काँग्रेस आणि विरोधकांना मोठय़ा प्रमाणात ट्रोल केले जाते असे त्यांचे निरीक्षण आहे. यामुळे ट्रोल आर्मीचा मुकाबला करण्यासाठी ट्रुथ आर्मी उभी करण्याचा निर्णय नवी दिल्ली येथे झालेल्या नागरिक समाज संघटनेच्या संमेलनात घेण्यात आला आहे. त्यासाठी २ लाख प्रचारकांची भरती केली जाणार आहे. विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रामध्ये २५ कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय, वैचारिक मुकाबला करण्यासाठी सोशल मीडियाची ऊर्जा ताकदीने वापरण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

भारत जोडो अभियानाच्या राष्ट्रीय अधिवेशनात २६ सदस्य मार्गदर्शक समिती, ८२ सदस्यांचे राष्ट्रीय परिषद आणि १९ सदस्यांची राष्ट्रीय कार्य समिती निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे सोशल मीडिया प्रभावीपणे हाताळण्याची जबाबदारी प्रामुख्याने सोपवण्यात आली आहे, असे स्वराज्य इंडियाचे महाराष्ट्र प्रतिनिधी इस्माईल समडोळे, प्रत्युष बाबा, दिलीप जोशी यांनी सांगितले.

भाजपनेही कंबर कसली

 राज्यातील भाजपचा सोशल मीडिया प्रभावी नसल्याचे निरीक्षण अलीकडे दोनदा नोंदवण्यात आले. हिवाळी अधिवेशनावेळी नागपूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ व्या शतकात सोशल मीडियावर क्रियाशील नसल्याबद्दल आमदारांना कानपिचक्या दिल्या होत्या. अलीकडे नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही फडणवीस यांनी याच मुद्दय़ावरून कान टोचले. सोशल मीडियावर २५ हजार फॉलोअर्स असल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही. राज्यात लोकसभेच्या ४५ व  विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर न करणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना खडसावले आहे. हे पाहता आता भाजपसुद्धा समाज माध्यमात तयारीने उतरण्याच्या पवित्र्यात असल्याने विरोधकांशी तुल्यबळ सामना रंगण्याची चिन्हे आहेत.