कोल्हापूर : गारगोटी शहरातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेला खो घातला जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर यांच्यासह सहकाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदतउपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला शिंदे गट वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.

गारगोटीच्या वाढत्या लोकसंख्येसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने मार्च महिन्यात २२ कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा मंजूर झाली. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झाले.

हेही वाचा >>> चंद्रकांतदादा पाटील यांनी वाणी सांभाळावी; बाबरी प्रकरणी कोल्हापुरात ठाकरे गटाची टीका

या योजनेसाठी या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी १८ एकर क्षेत्र गारगोटी ग्रामपंचायत देखरेखीखाली सरपंच गायरान असे नोंद होते. तथापि काही राजकीय दबाव पोटी ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्व सूचना पूर्व नोटीस न देता महसूल खात्याने सरकार गायरान अशी चुकीची बेकायदेशीर नोंद केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही जमीन जल शुद्धीकरण प्रकल्पात द्यावी असा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. तथापि याबाबत महसूल विभाग निर्णय घेत नाही आणि त्यामध्ये राजकीय दबाव आहे असा संशय आंदोलकांनी आज व्यक्त केला.

राजकीय संघर्ष

हुतात्मा चौक येथे सुरू झालेल्या आंदोलनाला  राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील, भाजपचे संघटन मंत्री नाथाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला. या आंदोलनामुळे गारगोटी मध्ये आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध अन्यपक्षीय कार्यकर्ते असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.