कोल्हापुरात आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. कोल्हापुरातल्या महाविकास आघाडी नेत्यांची डबल ढोलकी असते, असं ते म्हणाले आहेत. कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचा जाहीरनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, “तुम्ही कोल्हापूर शहरात आला तर विकास निधी वाढेल. त्याचा गावांच्या विकासासाठी फायदा होईल, असं आम्ही गेल्या पाच वर्षात या गावांना अनेकदा सांगितलं. परंतु, या गावांनी ऐकलं नाही. या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची नेहमी डबल ढोलकी असते. जिल्हा परिषदेची निवडणूक आली की शहरात येणार नाही म्हणून सांगतात आणि पालिकेची निवडणूक आली की हद्दवाढीची मागणी करतात. हरण्याची स्थिती आल्याने रोज नवी घोषणा चालली आहे. हिंमत असेल तर पाच गावांची हद्दवाढ कराच. बघा येतात की नाही अंगावर.”


चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले,”हद्द वाढ करण्यास गावांचा विरोध असल्याने शेवटी देवेंद्र फडणवीसांनी कंटाळून प्राधिकरण दिलं. कधी तरी ही गावं शहरात येतील, तसेच या प्राधिकरणातून गावांचा विकास होईल या हेतूने फडणवीसांनी प्राधिकरण दिलं होतं. पण दोन वर्षात प्राधिकरणाची वाट लावण्यात आली आहे. हद्दवाढही नाही आणि प्राधिकरणाचं काम नाही. हद्दवाढ आजूबाजूच्या गावाला पटवून दिल्याशिवाय होत नाही. भाजपच्या जागा ८० च्या खाली जात नसल्याचा रिपोर्ट आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुण्यात आजूबाजूची गावं वाढवली. तरीही भाजपाच्याच जागा वाढणार म्हणून रिपोर्ट आला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सध्या वेगात सुरू आहे. इथं जिंकण्यासाठी सर्वच पक्ष जोमाने कार्यरत आहेत. येत्या १२ एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर १८ एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभेचा निकाल लागणार आहे.