कोल्हापूर : ‘दहा महिन्याच्या कालावधीत कोल्हापूरच्या विकासासाठी ७६२ कोटी रुपये दिले याचा अभिमान वाटतो,’ असा गौरवपूर्ण उल्लेख करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी करवीर नगरीत बोलताना कोल्हापूरच्या मातीचे भरभरून गायन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ शासन आपल्या दारी’ हा उपक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले. पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने या खासदारांसह आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटकेनियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदींनी केले.

हेही वाचा >>> “सर्व्हेतील पसंतीचे श्रेय एकट्या माझं नाहीतर…”, एकनाथ शिंदेंकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

कोल्हापुरी साद

 ‘आजची गर्दी पाहता विरोधकांची अवस्था टांगा पलटी घोडे फरार अशी झाले आहे. काटा किर्र करणारे चित्र आहे,’ असा कोल्हापुरी भाषेचा लहेजा वापरत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरचे गुणगान सुरु ठेवले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पुनीत झालेल्या कोल्हापूरच्या भूमीत धाडसी बाणा आहे. संकटाशी मुकाबला करून यशस्वी कसे व्हायचे हे महापुराच्या आपत्तीतून येथील जनतेने दाखवून दिले आहे. शक्ती आणि भक्ती याचा संगम या नगरीमध्ये झाला आहे, असे ते म्हणाले.

६० हजारांना लाभ

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम म्हणजे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा देणाऱ्या उपक्रमाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार सामान्यांचे आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचा ६० हजार नागरिक लाभ घेणार आहेत, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा >>> “इतके लोकप्रिय आहात तर मग…”, अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी!

कोल्हापूरला न्याय देणार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कोल्हापूरचा टोल बंद होणे शक्य नव्हते. पण कोल्हापूरकरांच्या निग्रहामुळे तो झाला. ४७३ कोटी रुपये देऊन टोल बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा मंत्री मीच होतो. त्यासाठी लागणारे धाडस आमच्या सरकारमध्ये आहे. कोल्हापूर मध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी मी मुख्य न्यायाधीशांना जातीने विनंती करणार आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. हे काम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde grant 762 crore fund for kolhapur development zws
First published on: 13-06-2023 at 21:24 IST