पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून चिंता व्यक्त
कोल्हापूर जिल्हय़ात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे, दुसरीकडे वस्त्रोद्योगातील प्रोसेंसिंग (कापड प्रक्रिया गृह) व्यवसायाला मात्र दररोज तब्बल १२ दशलक्ष लिटर (एमएलडी) शुध्द पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ही शुध्द पाण्याची नासाडी हा पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा बनला आहे.
इचलकरंजी शहरासाठी ४५ एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यातील सुमारे १५ दशलक्ष पाण्याची गळती होते, तर प्रोसेस उद्योगाला १२ एमएलडी पाणी पुरवठा होतो. शहरात लहान मोठे सुमारे ८० प्रोसेसर्स असून, त्यामध्ये रसायनांचा वापर केला जातो. प्रोसेसमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडत असल्याची तक्रार झाल्यानंतर २० कोटी रुपये खर्च करून सहा वर्षांपूर्वी १२ एमएलडी क्षमतेचा सीईटीपी (संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रकल्प) बांधण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात असल्याचा प्रोसेसर्स संघटनेचा दावा आहे.
प्रोसेस उद्योगाला कूपनलिका, टँकरद्वारा अत्यल्प, तर नगरपालिकेकरवी पिण्याचे शुध्द पाणी मुबलक प्रमाणात पुरवले जाते. तीव्र पाणी टंचाईमुळे इचलकरंजीकरांना आठवडय़ातून फक्त दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. दुसरीकडे प्रोसेस उद्योगाला सुमारे १२ एमएलडी शुध्द पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.
उद्योगासाठी पिण्याचे शुध्द पाणी इतक्या मोठय़ा प्रमाणात देण्याचे कारणच काय, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. याबाबत इचलकरंजी नागरिक मंचचे अभिजित पटवा म्हणाले,ह्व उद्योग टिकले पाहिजेत, पण त्यासाठी पिण्याचे शुध्द पाणी पुरविण्याची गरज नाही. उद्योगास शुध्द न केलेले (रॉ वॉटर) पाणी देण्याच्या पर्यायाचा विचार केला जावा.ह्व
शेतातील पिके वाळून जात असल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगाच्या पाणी पुरवठय़ात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. औद्योगिक वसाहतींच्या पाणी पुरवठय़ात तितकी कपात झाल्याने तेथील उद्योगासाठी टँकरद्वारे पाणी विकत घेतले जात आहे. पण, इचलकरंजीत उद्योगास खुलेआम पिण्याचे पाणी दिले जात असल्याबाबत विचारले असता पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी, हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत याबाबत पालिका पातळीवर विचार करण्याचे आश्वासन दिले.