राज्याला विकास आणि स्थिरता देण्यासाठी भाजप शिवसेनेची युती झाली. वरिष्ठ पातळीवरच्या या निर्णयाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाष्य करण्याचा अधिकार नाही, असा टोला शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावत दादा-ताई यांच्यातील वादाच्या दुसऱ्या अध्यायाला तोंड फोडले. युती करते वेळी भाजपाला कोणी अडवले होते काय असा सवाल करीत गो-हे यांनी युती तोडण्याचे खापर शिवसेनेवर टाकण्यासाठी भाजपकडून अशी विधाने केली जात असल्याचा आरोप केला. शरद पवार व अजित पवारांनी बारामतीचा विकास अनेक घोटाळे करून केला आहे. या घोटाळ्यांमधून पवारांना सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष सिद्ध केल्यावरच बारामतीत जाऊ, अशी खरमरीत टीकाही त्यांनी काका-पुतण्यांवर केली.
आमदार गो-हे यांनी पालकमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालतात असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना पालकमंत्र्यांनी गो-हे यांनी आपल्याला मंत्रिपद कसे मिळेल हे पाहावे, असा सल्ला देत शिवसेना सत्तेबाहेर पडली तरी चालेल असे विधान केले होते. वादाचा हा पहिला अध्याय संपला असे वाटत असताना गो-हे यांनी तो आणखी वाढवत ठेवला. पत्रकारांशी बोलताना गो-हे म्हणाल्या, मंत्री चंद्रकांत पाटील यांना किती खिसे व त्या खिशात किती पक्ष आहेत हे माहीत नाही. मात्र त्यांची अवस्था मुंगेरीलाल के हसीन सपने अशी झाली आहे. सरकारस्थापनसेसाठी दोन पर्याय असल्याचेही दादा सांगत असले तरी ती त्यांची दिवा स्वप्ने आहेत.
उद्धव ठाकरे यांना बारामतीचा विकास पाहण्यासाठी अजित पवारांनी निमंत्रण दिले होते. याबाबत बोलताना गो-हे म्हणाल्या, बारामतीच्या विकासाचा पाया चुकीच्या गोष्टींवर रचला आहे. बारामतीचा विकास जमिनी लाटून व अन्य मार्गाने घोटाळे करून केला आहे. अजित पवार हे स्वत सिंचन घोटाळ्यामधील आरोपी असून आजही बारामती तालुक्यातील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. बारामतीमध्ये केवळ विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत. अजित पवारांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यानंतर बारामतीचे निमंत्रण स्वीकारू असा टोला लगावला.
६० जणांची हद्दपारी कधी
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रेकॉर्डवरील ६० गुंडांना हद्दपार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही याबाबत काहीच कारवाई केली नाही. अद्यापही गुंडांना नोटिसा लागू केल्या नाहीत. यामुळे आता आपण मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे गो-हे यांनी सांगितले.