कोल्हापूर : दसरा दिवाळीचे दिवस आले की कोल्हापुरात एक वेगळीच समस्या डोके वर काढत असते. या कालावधीत भिक्षेकरांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. देवदर्शनासाठी आलेल्या भाविक- पर्यटकांच्या अक्षरशः अंगचटीला पडून भीक मागण्याच्या पद्धतीमुळे ते त्रस्त झालेले आहेत. अशा भिक्षेकरांच्या शिक्षेचे स्वरूप अगदीच मुळमुळीत असल्याने त्यास भिक न घालता भिक्षेकरी पुन्हा भीक मागत भाविक, पर्यटकांना उपद्रव करीत राहण्याचे दुष्टचक्र मात्र सुरूच राहते. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायदा केवळ कागदावर राहिल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दसरा – दिवाळीच्या काळात विशेष गर्दी होत असते. साडेतीन खंडपीठापैकी एक असलेले करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबा या दोन तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. देवदर्शनाबरोबरच जिल्ह्यातील अन्य धार्मिक, पर्यटन केंद्राच्या ठिकाणी या भाविक, पर्यटकांचा वावर वाढलेला असतो. नेमकी हीच परिस्थिती भिक्षेकरांच्या पथ्यावर पडत असते. उत्तर कर्नाटक तसेच मिरज, पुणे ग्रामीण परिसरातून भिक्षेकरांचे लोंढेच्या लोंढे नवरात्रीच्या काळात कोल्हापुरात दाखल होतात. त्यांची भीक मागण्याची पद्धत ही विलक्षण आहे.
‘ लहान मुलांना सोबत घेऊन भावनिक आवाहन करीत भीक मागितली जाते. त्यासाठी प्रसंगी भाड्याने मुलेही घेतली जातात. नवरात्री, दिवाळीच्या काळात या भिक्षेकरांची दोन हजाराहून अधिक रुपयांची प्राप्ती होते ,’ असे भिक्षिकरांचे प्रबोधन करणाऱ्या ‘ अवनि’ या संस्थेचे निरीक्षण आहे. त्यांच्यातील पुरुष खेळणी वा तत्सम वस्तूंची विक्री करीत असतात. चांगली कमाई होत असल्याने भिक्षेकरी कोल्हापुरातच सणाच्या काळात मुक्काम वर्षानुवर्ष ठोकत आले आहेत.
प्रशासनाकडे तक्रारी
याबाबत ‘ अवनि ‘ या सामाजिक संस्थेने भिक्षेकऱ्यांचे प्रबोधन होण्यासाठी ‘ उडान’ नावाचा उपक्रम सुरू ठेवला आहे. त्यातून भिक्षेकर्यांशी संवाद साधून त्यांना या चक्रातून बाहेर पडून स्वयंरोजगार करावा, त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी प्रबोधन केले जाते. याचवेळी, अनेकदा सांगूनही ऐकत नाही अशा भिक्षेकर्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सांगितले जाते. पोलिसांना सणाच्या काळात सुरक्षासह अन्य कामाचा ताण असतो. शिवाय, पोट भरून खातात; जाऊ द्या की अशी ही एक वृत्ती त्यांच्यात दिसते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात कारवाई होत नाही.
फुटकळ शिक्षा
तक्रारीनंतर पकडलेल्या िक्षेकर्यांना विशेषतः बाळासह महिला भिक्षेकर्यांना महिला व बालकल्याण समितीसमोर सादर केले जाते. यावेळी त्यांचे समुपदेशन केले जाते. बंधपत्र लिहून घेऊन मुक्तता केली जाते. अशा फुटकळ शिक्षेमुळे भिक्षेकऱ्यांची वृत्ती तीच राहून पुन्हा त्यांचे भीक मागण्याचे उद्योग पूर्ववत सुरू राहतात. खेरीज, हातातील मुलापासून अगदी लहान मुलांच्या संगोपनाचे करायचे काय हाही प्रश्न बालकल्याण समिती समोर उरतोच. परिणामी िक्षेकर्यांना भिक्षेपासून दूर करण्याची शासकीय पद्धत परिणामकारक नसली तरी ती तशी व्हावी असा प्रयत्न असल्याचे ‘अवनी’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितले.
कारवाई होणार
कोल्हापुरात सण काळातीलभिक्षेकर्यांच्या या उपद्रवाबाबत अवनि संस्थेने आज जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा एकदा पत्र दिले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ‘ लोकसत्ता’ला सांगितले की, ‘ संबंधित भिक्षेकर्यांवर आक्रमकपणे कारवाई करण्याबाबत महिला बालकल्याण समिती व पोलीस यांना सांगितले आहे. ही संयुक्तपणे मोहीम राबवली जात असून संबंधितांवर उचित कारवाई होईल.