पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाने लोकसहभाग वाढवून जंगल आणि निसर्गाचे रक्षण करण्याकामी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) एम.के.राव यांनी रविवारी येथे बोलताना केले.
येथील वन विभागाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या वन शहीद दिन कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षक एम.के.राव बोलत होते. यावेळी वन शहीद दिनानिमित्त वन वर्धन इमारतीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमास उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, विभागीय वनअधिकारी एम.एस.भोसले आदीजण उपस्थित होते.
दिवसेंदिवस हवामानात होणारा बदल आणि तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनास सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे सांगून. राव म्हणाले, शासनाने यावर्षीच्या पावसाळयात राज्यात २ कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली होती, ही मोहीम राज्यातील जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादमुळे यशस्वी झाली. एकटय़ा कोल्हापूर जिल्हय़ात यंदाच्या पावसाळयात सुमारे ८ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली.
या रोपांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. वन शहीद दिनानिमित्त राव, शुक्ला यांनी हुतात्म्यांच्या प्रती आदर व्यक्त करून त्यांना आदरांजली अर्पण केली तसेच वन शहीद दिनाचे महत्त्व विषद केले.