कोल्हापूर : भादोले (तालुका हातकणंगले) येथे भटका विमुक्त संघटना, यशवंत क्रांती संघटना, जिद्द बांधकाम कामगार संघटना, नरवीर उमाजी नाईक संघटना, बळीराजा पार्टी आणि कर्नाटकमधून रयत संघटना आदींनी एकत्र येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शिवाजी माने यांच्यासाठी जीवाचे रान करून त्यांना निवडून आणण्याचा विडा उचलला.

सध्याच्या या पक्षांच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळली आहे. तसेच आजपर्यंत चळवळीत काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ताच निवडून गेला पाहिजे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनता ही कायमच सर्वसामान्यांच्या पाठीशी राहत असल्यामुळे शिवाजी माने यांची उमेदवारी घोषित करीत असल्याचे कर्नाटक राज्य रयतचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी जाहीर केले.

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

भटका विमुक्तचे भीमराव साठे यांनी संपूर्ण भटक्या विमुक्त समाजाला घेऊन शिवाजी माने यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी सांगून, सर्वसामान्य जनतेनेही आपल्यातीलच सर्वसामान्य उमेदवार निवडून द्यावा असे आवाहन केले. यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संघटनेच्या ३०० शाखा असून या सर्व शाखांतील कार्यकर्ते शिवाजी माने यांच्या मागे उभे करणार असल्याचे यावेळी वचन दिले.

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार यांनी त्यांच्या संघटनेचे ७००० सभासद असल्याचे सांगून, या सर्वांच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चाने शिवाजी माने यांच्यासाठी आजपासूनच कामाला लागत असल्याचे जाहीर केले. इचलकरंजी येथून अभिषेक पाटील यांनी संपूर्ण इचलकरंजी शहरांमधून यंत्रमाग धारकांना व शेतकऱ्यांना घेऊन आपल्यातील सामान्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, संपूर्ण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील जबाबदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शिरोळचे माजी सभापती अविनाश पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी शिरोळ तालुका संपूर्ण पिंजून काढून, चळवळीतील कार्यकर्त्याला कायम साथ देणारा आमचा तालुका असल्याचे सांगून, शिरोळ तालुक्यामधून असणारे छोटे-मोठे सगळे गट यांना एकत्र करून शिवाजी माने यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा – मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

यावेळी जय शिवरायचे शेलार मामा सदाशिव कुलकर्णी काका, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, जय शिवराय शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष शितल कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जय शिवराय किसान संघटनेच्या शाहूवाडी तालुका अध्यक्षपदी रामचंद्र खोपडे यांची निवड करण्यात आली. जय शिवरायचे युवा आघाडी अध्यक्ष महेश मोहिते यांनी स्वागत केले, विजय गायकवाड यांनी आभार मानले.