कोल्हापूर : गोकुळ दूध संघात महायुतीचा अध्यक्ष करायचा आहे असा दावा करणारे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, तसेच आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी चांगलेच फटकारले. शब्द पाळायचा नाही हा डोंगळे यांचा इतिहासच आहे, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी त्यांचे वाभाडे काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करायचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही, असे विधान डोंगळे यांनी काल केले होते. गोकुळचे नेते मुश्रीफ व पाटील यांनी कोल्हापुरात आल्यावर आज पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली.

मुश्रीफ म्हणाले, ‘महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असती, तर ते मी महायुतीतला महत्त्वाचा घटक असल्याने मला बोलले असते. डोंगळे हे राष्ट्रवादी असल्याने अध्यक्षपदाबाबत ते अजित पवार यांच्याकडे का गेले नाहीत. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून नव्हे, तर शाहू आघाडी म्हणून लढलो आहे. डोंगळे यांना सत्तेची खुर्ची सोडवत नाही.’

गोकुळसारख्या जिल्हास्तरीय संस्थेच्या अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष घालतील, असे मला वाटत नाही, असे नमूद करून आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि मुश्रीफ एकत्र आहोत. आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात होतो. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते.’

खासदार धनंजय महाडिक यांना गोकुळ संदर्भात ज्ञान कमी आहे. भीमा कारखान्याचे ऊसगाळप किती झाले आहे याची माहिती त्यांनी दिली, तर कोल्हापुरातील सहकाराला ते मार्गदर्शन ठरेल, असा टोला पाटील यांनी लगावला.