कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या एकंदरीत कारभारावरून संतप्त आवाज उठू लागल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेत घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. तर आठवड्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी थेट आयुक्तांच्या कामकाज पद्धतीवरच नाराजी व्यक्त केली.
प्रशासक तथा आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना केवळ आदेश न देता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावे. गोलगोल उत्तरे न देता कामा कार्यक्षमता दाखवून द्यावी, अशी परखड अपेक्षा पालकमंत्र्यांनी या बैठकीवेळी व्यक्त केली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरळीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच, शहरातील नागरिक, पर्यटकांसाठी महानगरपालिकेने दर्जेदार रस्ते तयार करावेत, असे आदेश पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले.
आबिटकर म्हणाले, १०० कोटी निधीच्या माध्यमातून रस्त्यांची होणारी कामे गुणवत्तापूर्ण करावीत. रस्ते टिकावू होण्यासाठी ते सिमेंटचे करण्यात येतील. शहरातील ४० हजार मालमत्ता धारकांच्या मोजणीच्या अनुषंगाने ९४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील निळ्या रेषेबाहेरील जागेत बाह्य वळण रस्ता होण्यासाठी प्रयत्न करू.
कोल्हापूरात टीडीआरचे धोरण जाहीर करावे, रिक्त पदांची भरती करावी, उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुचवले. महानगरपालिकेच्या खुल्या जागांसंदर्भात नोटीस द्यावी. आमदार फंडातून रस्ते दर्जेदार करावेत. हद्दवाढ लक्षात घेऊन आतापासून नियोजन करावे, असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
विकास हस्तांतरणीय हक्क मोजणी अहवालावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. महानगरपालिका प्रशासक के. मंजू लक्ष्मी म्हणाल्या, टीडीआरच्या अनुषंगाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी लवकरच एसओपी तयार करण्यात येईल.
बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, रेखांकन, रिंग रोड, सिटी डेव्हलपमेंट, पार्किंग, अतिक्रमण, पाणीपुरवठा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेतला.
येत्या काही महिन्यांत कोल्हापूरच्या विकासाचे एक नवीन मॉडेल निश्चितपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचवेळी अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी अचानक भेटी कराव्यात. या कामांमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांनी कसूर करू नये, अशा सक्त ताकीद दिली. या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजीराव भोसले, नगररचना सहायक संचालक विनय झगडे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.