कोल्हापूर : मी परिपक्व असल्याने कधीही पेपरवेटने टीव्ही फोडण्याची वेळ आली नाही. मी कधीही नॉटरिचेबल राहिलो नाही. मला कधीही इव्हेंट करावा लागला नाही. एखाद्या घटनेने मी कधीही विचलित झालो नाही. फाजील आत्मविश्वास बाळगला नाही, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना लगावला.

मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर हसन मुश्रीफ कागलमध्ये आले. कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. गैबी चौकामध्ये त्यांचा नागरी सत्कार व जाहीर मेळावा संपन्न झाला. व्यासपीठावर खासदार संजय मंडलिक, सायरा मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ईडी भीती नव्हे सेवेसाठी

ईडीच्या धाकाने नव्हे तर अजित पवार यांना एकाकी पाडायचे नाही. म्हणून त्यांना साथ देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे – फडणवीस सरकारबरोबर गेलो, असा खुलासा मुश्रीफ यांनी केला.

हेही वाचा – आपला मुलगा सुरक्षित शाळेत जात आहे काय? नागपुरात ७६२ ‘स्कूलबस’कडे योग्यता प्रमाणपत्र नाही

आजच आम्ही भाजपाला पाठिंबा देतोय असे नाही. २०१४ मध्ये कोणाचेही बहुमत न झाल्याने राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला होता. अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी राहिले. ३५ – ४० वर्षे समाजकारण व राजकारण करीत आहे. विकासकामे किती केली याचे पुस्तक २०२४ च्या निवडणुकीत काढेन. वीस वर्षे मंत्री राहण्याची संधी मिळाली आहे. गोरगरिबांचे काम व जिल्ह्याचा विकास याची शपथ घेतली आहे.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतेवेळी आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांचा सल्ला घेतला होता. मुश्रीफ यांच्या वयाचा विचार केला तर ते जिल्ह्यातील ज्येष्ठ आहेत म्हणूनच ते जिल्ह्याचे पालक आहेत.

हेही वाचा – महाविद्यालयीन तरुणाने तलवारीने कापले दहा केक, भंडारा येथील घटना

शायरीचा अंदाज

सत्कार सोहळ्यात मंत्री मुश्रीफ यांची शेरोशायरी गाजली. “तुम लाख कोशिश कर लो मुझे रोकने की मै जब भी टूटा हूँ, जबजब बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से मै आगे बढा हूँ”, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदनामी करण्याचे कारण काय?

सभा संपल्यानंतर पत्रकारांनी मंत्री मुश्रीफ यांना समरजित घाटगे यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. या संबंधातील सर्व चर्चा मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या आहेत. असे असतानाही भाजपाचे हे अध्यक्ष असूनही घाटगे त्यांचा अपमान करून बदनामी करीत आहेत की काय? असा प्रश्न केला.