कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ कुटुंबाचा घोटाळा १५८ कोटींचा वाटत होता. मात्र तो पाचशे कोटीहून अधिक रकमेचा आहे, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी येथे केला.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून किती बोगस कर्ज घेतले, याची माहिती मुश्रीफ यांनी सात दिवसात द्यावी, अन्यथा आम्ही त्याचा आकडा जाहीर करतो, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.
दरम्यान, माझ्यावर नाहक आर्थिक घोटाळय़ाचे आरोप करण्यात आले आहेत. त्याची सर्व यंत्रणांनी चौकशी सुरू ठेवली आहे. तरीही किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येण्याची गरज काय हे समजले नाही, असा प्रतिप्रश्न आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. हे माझ्या बदनामीचे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आमदार हसन मुश्रीफांच्या घोटाळा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले,की हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा केला आहे. त्यांची ईडी , प्राप्तिकर, तसेच सहकार खात्याकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय त्याच्या जवळच्या लोकांनी १५८ कोटींचा घोटाळा केल्याचे दिसत होते. आता मात्र तोच घोटाळा ५०० कोटींहून अधिक असल्याचे समोर येत आहे. प्राप्तिकर विभागाने छापा घातला होता. त्या वेळी त्यांना ९२ कोटीच्या प्राप्तिकराची नोटीस आली होती. त्यावर मुश्रीफ हे त्या विभागात कशासाठी होते हे सांगावे. मुश्रीफांनी केलेल्या घोटाळय़ांची चौकशी आणि कारवाई सुरू राहणार, असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
