शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाने कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात गारांसह मुसळधार पाऊस झाला. गारांचा खच इतका पडला होता की बालगोपालांनी चक्क टोपली भरून गारा गोळा करून त्याचा आनंद लुटला. पावसामुळे जिल्ह्यातील शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पारा चाळीशी अंशाकडे झुकला होता, प्रचंड उकाडा जाणवत होता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली.

गारांचा वर्षाव

पश्चिमेकडील राधानगरी, भुदरगड, पन्हाळा भागात जोरदार पाऊस झाला. येथे गारांचा अक्षरशः वर्षाव झाला. गारांचा खच रस्त्यावर अर्धा फुटापर्यंत साचला होता. गारा गोळा करण्यासाठी बालगोपाळांची झुंबड उडाली होती. एरवी हातातून गारा गोळा करण्याचा आनंद घेणाऱ्या मुलांनी आज चक्क टोपली, ओंजळ भरून गारा गोळा केल्या, असे वेगळे चित्र आज ग्रामीण भागांमध्ये पाहायला मिळाले. लॉकडाउनमुळे घरात कोंडल्या गेलेल्या मुलांना आजची सायंकाळ मुक्त आनंद देणारी ठरली.

कोल्हापुरात पर्जन्यवृष्टी

कोल्हापूर शहरात सायंकाळी पाच वाजल्यापासून आकाशात काळे ढग जमण्यास सुरुवात झाली होती. शहरालाही सायंकाळी पावसाने झोडपून काढले. लॉकडाउन सुरू असल्याने लोक घरात असल्याने पावसाचा त्रास कोणाला सहन करावा लागला नाही. जिल्ह्याच्या पूर्वेकडील हातकणंगले, शिरोळ तालुक्यात ही जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील काही दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

शेट्टींची पॅकेजची मागणी

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतमालाचे अतोनात नुकसान झाले होते. आज पुन्हा वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला. भाजीपाला, फळफळावळ आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच शेतमालाचा उठाव होत नसल्याने शेतकरी चिंतेत असताना दोनदा आलेल्या मोठ्या पावसाने नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली असल्याने त्यांना शासनाने विशेष पॅकेज देवून मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे केली आहे. त्यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. अन्यथा, करोनाग्रस्त बळींपेक्षा राज्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या मोठी होईल, अशी भीतीही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.