इचलकरंजी येथील लालनगरमध्ये मंगळवारी सकाळी गॅसगळती होऊन आगीचा भडका उडून झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले. शिवानंद कांबळे, उज्ज्वला कांबळे, कुमार कांबळे आणि अनिल वासुदेव अशी जखमींची नावे आहेत. स्फोटामुळे घरासह प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे. शिवानंद आणि उज्ज्वला यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
लालनगर परिसरातील गल्ली नं. ३ मध्ये नागाप्पा कांबळे हे एका लहान खोलीत कुटुंबीयासह राहण्यास आहेत. ते नातलगांकडे कार्यक्रमासाठी पत्नीसह परगावी गेले होते.
शिवानंद, कुमार आणि उज्ज्वला हे तिघे जण घरीच होते. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उज्ज्वला ही चहा करण्यासाठी गॅस शेगडी पेटवण्याचा प्रयत्न करीत असताना सििलडरमधील गॅसची गळती झाल्याने भडका उडाला.
मोठा आवाज होऊन स्फोट झाला. घरात झोपलेले शिवानंद, कुमार आणि उज्ज्वला तिघेही गंभीररीत्या भाजले. तर यांच्या घरासमोर राहणारा अनिल वासुदेव हाही जखमी झाला. स्फोटाच्या तीव्रतेने घराच्या छताचे पत्रे उडमून गेले आणि िभतीही पडल्या. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.