कोल्हापूर : इचलकरंजी शहर परिसरातील राजू नदाफ याच्या ‘एसएन’ टोळीवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी निर्गमित केले आहेत. या टोळीवर १७ गंभीर व एक अदखलपात्र असे १८ गुन्हे दाखल झाले आहेत.

गुंड सलमान राजू नदाफ याच्या नेतृत्वाखाली एसएन टोळीचे सदस्य अविनाश विजय पडियार, असलान यासीन सय्यद, यश संदीप भिसे, रोहित शंकर असाल (सर्व रा. इचलकरंजी) व अनिकेत विजय पवार (रा. दत्तवाड) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस विभागाच्या पत्रकात म्हटले आहे, की पूनम प्रशांत कुलकर्णी (वय ४३, रा. जैन बस्ती, इचलकरंजी) यांच्या ब्युटी पार्लर येथे फटाके उडवण्यावरून वाद झाला होता. त्यावरून टोळी प्रमुख नदाफ याने कुलकर्णी यास दगड मारून जखमी केले. पाठोपाठ त्यांच्या ब्युटी पार्लरची तोडफोड केली. शेजारी राहणाऱ्या दयानंद माने यांच्या दुकानाचे व सागर पाटील यांच्या घराचेही नुकसान केले.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यानुसार इचलकरंजी पोलिसांनी संबंधित टोळीवर मोक्का लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाची छाननी करून त्यास सुनील फुलारी यांनी मोक्का लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

सक्षम प्राधिकृत अधिकारी सुनील फुलारी यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केल्यानंतर मोक्काअंतर्गत वाढीव कलमांचा अंतर्भाव करण्याबाबत पूर्वपरवानगी घेऊन तसे आदेश निर्गमित केले आहेत. मंजूर आदेशानंतर इचलकरंजी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या टोळीच्या, तसेच अन्य कोणत्या टोळीकडून गुन्हेगारांकडून नागरिकांना उपद्रव होत असेल, तर त्यांनी याबाबत संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबतची तक्रार दाखल करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित टोळीविरोधात यापूर्वी इचलकरंजी व परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. इचलकरंजी शहर व परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. त्यास अनुसरून यापूर्वी शहरातील अनेक टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित टोळीप्रमुख व गुन्हेगारांवर वचक बसला आहे. आता आणखी एका टोळीवर अशा प्रकारची कारवाई झाली असल्याने त्याचे स्वागत केले जात आहे.