कोल्हापूर : इचलकरंजी परिसरात उभारण्यात येणारे झेडएलडी प्रकल्पामुळे (शून्य निर्गत पाणी योजना) पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबून शहराचा पाणी प्रश्न सुटेल, हे आमदार राहुल आवाडे यांचे विधान दिशाभूल करणारे आहे. अशी मांडणी करून इचलकरंजीचा पाणी प्रश्न भरकटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुळकूड पाणी योजनेला बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्याच्या दिशेने आमदार आवाडे यांचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचा उल्लेख करतानाच प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी, त्यांच्याकडून पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या केवळ घोषणा झाल्या आहेत. काही उद्योगांसाठी पाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रदूषणमुक्त करून पंचगंगेचे प्रदूषण रोखू, असे आवाडे यांचे म्हणणे इचलकरंजीकरांची दिशाभूल करण्यासारखे आहे.
मुळात माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी ठोस काम न करता नवनव्या योजनांची मांडणी करून वेळ मारून नेली जात असल्याची टीका केली.
सागर चाळके यांनी काळम्मावाडी, वारणा, सुळकुड, रेंदाळ, म्हैशाळ अशा वेगवेगळ्या योजना पुढे आणण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुळकूड योजनेबाबत कोणतेही स्पष्ट भाष्य केले नाही. सत्ताधारी मंडळी पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कोणत्या योजनेतून पाणी मिळणार, याचा स्पष्ट खुलासा त्यांनी करावा, असे सांगितले.
पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरात तीन ठिकाणी अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. प्रदूषण रोखण्याच्या दिशेने शासनाने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे नमूद करत शशांक बावचकर यांनी पंचगंगा प्रदूषणाचा इतिहास पाहता उगमापासून संगमापर्यंत सांडपाणी पंचगंगेत मिसळते. २००८ साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल याबाबत वस्तुनिष्ठ माहिती देणारा आहे. तर २०१२ मध्ये इचलकरंजीत झालेली काविळीची लागण व त्यानंतर निरी संस्थेचा अहवालही स्पष्टता दर्शवितो. पाण्यासाठी शहरात पेयजल प्रकल्प, कृष्णा योजना बळकटीकरण, कट्टीमोळा डोहमधून पाणी उपसा अशा प्रकल्पांना प्राधान्य देत मूळ सूळकुड योजना होणारच नाही, याचाच प्रयत्न केला जात असल्याची टीका बावचकर यांनी केली. प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, सदा मलाबादे, भरमा कांबळे, भाऊसाहेब कसबे, बाबासाहेब कोतवाल, अमरजित जाधव आदी उपस्थित होते.