कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यास नम्र पूर्वक नकार दिला आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय ठाम आहे. याबाबतची भूमिका आठवडाभरात स्पष्ट करणार आहे अशी माहिती गोकुळचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण मतदारसंघ दोन वेळा पिंजून काढला होता.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर हातकणंगले हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला आहे. या जागेवरून चेतन नरके यांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मातोश्री वरून देण्यात आला होता.

हेही वाचा : कोल्हापुरात छत्रपती-मंडलिक घराणे १५ वर्षांनंतर पुन्हा समोरासमोर

ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानंतर नरके म्हणाले, कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली असती तर माझी उमेदवारी नक्की होती. ती जागा काँग्रेसला गेली. मी अजून कोल्हापूरच्या रिंगणातून बाहेर पडलेलो नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हातकणंगलेचा पर्याय दिला. मात्र, खासदार राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क करून दिलेल्या प्रस्तावाला मी नकार दिला आहे.

हेही वाचा : माझी उमेदवारी पक्की; खासदार धैर्यशील माने यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची डॉ. चेतन नरके यांनी भेट घेतली होती. या भेटीत नरके यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी घ्यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर नरके हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून नरकेंनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू ठेवलेला आहे. ठाकरेंच्या प्रस्तावानंतर त्यांना पुन्हा हातकणंगलेतून नव्याने सुरुवात करावी लागणार. शिवाय प्रचारातून पाया मजबूत केला असताना हातकणंगलेतून निवडणुकीला उभे राहणे शक्य नसल्याचे डॉ. नरके यांचे मत आहे.