कोल्हापूर : गोकुळतर्फे (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर) यंदाही गोवत्स द्वादशी (वसुबारस ) कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसंगी गोकुळतर्फे चीज, गुलाबजाम दोन पदार्थ बाजारात दाखल करण्यात आले. याशिवाय महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन हे विशेष पशुखाद्य उत्पादनांची घोषणाही यावेळी करण्यात आली.

गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय काँग्रेस विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत या नव्या उत्पादनांची घोषणा करण्यात आली.

गोकुळ चीज हे गायीच्या दूधापासून तयार केलेले प्रथिनयुक्त व पोषक उत्पादन असून कॅल्शियम, व्हिटॅमिन, झिंक, फॉस्फरस अशा घटकांनी समृद्ध आहे. गोकुळ गुलाबजाम हे दूध, खवा, तुपापासून बनवलेला स्वादिष्ट गोड पदार्थ आहे. तर महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन हे गाभण गायी – म्हशींसाठी वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले खास पशुखाद्य आहे.

एन.डी.डी.बी. (आनंद) यांच्या तांत्रिक सहाय्याने विकसित करण्यात आलेले हे पशुखाद्य १०० मुऱ्हा जातीच्या म्हशींवर चाचणीअंती अत्यंत प्रभावी ठरले आहे. ५० किलो पॅकमध्ये हे उत्पादन गोकुळच्या स्वतःच्या कारखान्यातून तयार होणार आहे. या उत्पादनांद्वारे गोकुळने पुन्हा एकदा दूध उत्पादक व ग्राहक वर्गाला नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देऊन निधी उभारला. या निधीतून पूरग्रस्त भागात खालीलप्रमाणे मदत कार्य करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधीस थेट योगदान १३ लाख २५ हजार रुपये सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील सुमारे १,००० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप  त्याची अंदाजे रक्कम १३ लाख रुपये पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांसाठी मोफत पशुखाद्याचा पुरवठा अंदाजे ३ लाख रुपये तसेच पूरग्रस्त भागात मोफत ३२०० लिटर दूध १ लाख ५० हजार किमतीचे दूध वाटप करण्यात आले. 

या सर्व उपक्रमांद्वारे गोकुळ  परिवाराकडून एकूण सुमारे ३१ लाख रुपयांची मदत पूरग्रस्त भागांसाठी करण्यात आली आहे. गोकुळ कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम, लक्ष्मण पाटील, कृष्णात चौगुले यांनी आज हा धनादेश सुपूर्द केला. या वेळी गोकुळ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.