कोल्हापूर : कोल्हापूरच्या १२ धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ ही ९० किलोमीटरची शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली. या सर्वांचे बुधवारी कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले . जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचा सत्कार करून पाठ थोपटली.

ही शर्यत १९२१ साली सुरु झाली असून यंदाचे हे ९८ वे वर्ष होते. जगभरातून २५ हजाराहून अधिक तर भारतातून ५० महिलांसह ४०० पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरच्या मोल यादव, चेतन चव्हाण, डॉ. विजय कुलकर्णी, दिलीप जाधव, गोरखनाथ माळी, सचिन बुरसे, स्वरूप पुजारी, विजय पाटील, अमरपाल कोहली, सुषमा रेपे, डॉ. केतकी साखरपे, डॉ. पराग वाटवे या चमूने ही आव्हानात्मक शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इच्छाशक्तीची कसोटी

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून, ती शरीर, मन आणि इच्छाशक्तीची कसोटी मानली जाते. पिएटर मारिट्सबर्ग मध्ये सकाळच्या थंड हवामानात सुरुवात होत असली तरी, डरबनच्या दिशेने जाताना तापमान झपाट्याने वाढून २५ अंश सेल्सिअसच्या वर गेले. अशा वेळी शरीर थकत जाते, पाय जड होतात, पण मनाच्या कणखरतेमुळेच या प्रत्येकाने अंतिम रेषा गाठली.