कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची राज्य शासनाला सुबुद्धी दे, असे साकडे शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीला घालण्यात आले. या वेळी इंडिया आघाडी, त्याचबरोबर शक्तिपीठविरोधी कृती समितीने महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असल्याचा आरोप केला.

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरसह राज्यातून तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे या महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत आज बैठक होत आहे. या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थक असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि राज्य शासनाला सुबुद्धी द्यावी आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, या मागणीसाठी इंडिया आघाडी आणि शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने साकडे घालण्यात आले.

शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर, परिसराला महापुराचा सर्वांत मोठा फटका बसणार आहे. हा महामार्ग विकासाकडे नाही, तर विनाशाकडे नेणारा आहे. यामुळे तो रद्द व्हावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

या प्रकल्पातून आपणाला काही मिळेल काय या आशेनेच काही लोक समर्थन करत आहेत, असा टोलाही त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला. मुंबईमध्ये शक्तिपीठाच्या समर्थनार्थ बैठक घेणाऱ्या आमदारांनी कोल्हापूरच्या जनतेने आपणाला निवडून दिले आहे, हे विसरू नये, अशी आठवण त्यांनी करून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरेसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शरद पवार राष्ट्रवादीचे शहरप्रमुख आर. के. पोवार, राजेश लाटकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.