कोल्हापूर : भारत-इंडोनेशिया या दोन देशांतील व्यापारी, औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच कोल्हापुरातील गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा करण्यासाठी इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वार्डोयो हे शुक्रवारी कोल्हापूरला भेट देणार असल्याचे येथे सांगण्यात आले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील निवडक प्रमुख उद्योजक, व्यावसायिक यांच्यासोबत सकाळी ९ वाजता कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या झंवर सभागृह, शिवाजी उद्यमनगर येथे बैठक होणार आहे. मुंबई येथील इंडोनेशिया कौन्सिलेट अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख इको ज्युनॉर, अधिकारी श्रीमती डायन हयाती सॅम्सूवीर किबे, प्रशासन विभागाचे मुस्तफा अन्सारी हे अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच कोल्हापुरातील निवडक प्रमुख व्यापारी व उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे आमंत्रण दिल्याबद्दल इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वार्डोयो यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचे आभार मानले आहेत.

कोल्हापूरच्या उद्योग व व्यापार क्षेत्राचा प्रगतीशील चेहरा आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या संधींची सविस्तर माहिती या बैठकीत दिली जाणार आहे. दरम्यान, भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंधांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मसाल्यांपासून वस्त्रउद्योग, रसायन, शेती, पर्यटन आणि सेवा क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मोठी देवाणघेवाण होते. विशेषतः महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र इंडोनेशियासाठी महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. या भागातील साखर उद्योग, पोलाद उद्योग, ऑटो पार्ट्स निर्मिती, वस्त्रोद्योग आणि लघुउद्योगांना इंडोनेशियाशी व्यापार वाढविण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

या बैठकीत द्विपक्षीय गुंतवणूक, उद्योग सहकार्य, पर्यटन, शैक्षणिक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संबंध यावरही चर्चा होणार असल्याची माहिती गांधी यांनी दिली. इंडोनेशियाच्या उद्योग क्षेत्रातील संधी कोल्हापुरातील उद्योजकांना सांगितल्या जाणार असून, त्याचबरोबर महाराष्ट्रातील उद्योग-व्यापारासाठी इंडोनेशियामध्ये गुंतवणुकीचे दार खुले होणार असल्याचेही गांधी म्हणाले. ही बैठक कोल्हापुरातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी ऐतिहासिक ठरेल. भारत-इंडोनेशिया संबंधांना अधिक गती देत कोल्हापूर या नव्या आंतरराष्ट्रीय भागीदारीचा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरेल, असेही ते म्हणाले.

कोल्हापुरात गुंतवणूक संधी

कोल्हापूर जिल्हा उद्योग, कृषी आणि व्यापारात आघाडीवर आहे. येथे तयार होणारे ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स, चप्पल, ज्वेलरी आणि साखर उत्पादने देशभरात प्रसिद्ध आहेत. अलीकडील काळात या भागातील स्टार्टअप्स आणि निर्यातक्षम लघुउद्योगांनीही गती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर इंडोनेशियासारख्या आग्नेय आशियाई देशाशी व्यापार वाढवणे ही कोल्हापूरसाठी नवी संधी ठरणार आहे.