जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगूल वाजले असताना सध्या सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष अद्याप सुस्त आहे. उलट, निवडणुकीत रंग भरू लागला असताना काँग्रेस पक्षातील मतभेदांची चर्चा होऊ लागली आहे. एकीकडे कार्यकत्रे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धडपडू लागले असताना नेते मात्र आपल्या गटाची ताकद वाढवण्यात मग्न आहेत. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्यातील शीतयुद्ध, हातकणंगले तालुक्यात जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे यांच्यातील संघर्ष पाहून तळातील काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते धास्तावले आहेत, तर निवडणूक लढवू इच्छिणारे कार्यकत्रे द्विधा मन:स्थितीत आहेत.

गेली पाच वष्रे जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. सतेज पाटील यांच्या शब्दाला येथे महत्त्व आहे. बदलत्या राजकारणात ही सत्ता टिकवणे काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी सत्तेचे दावेदार असल्याचे सांगत जिल्हा परिषदेवर पक्षाचा झेंडा फडकवण्याची तयारी चालवली आहे. याच वेळी काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष, माजी आमदार पुत्र अनिल यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणखीही काही प्रमुख कार्यकत्रे हाती कमळ घेण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी काँग्रेस एकसंध असणे अपेक्षित आहे.

गोकुळचे राजकारण आडवे

पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्यातील विसंवादास गोकुळ दूध संघाचे राजकारण आडवे येत आहे. गोकुळचे सर्वेसर्वा माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्यात सख्य आहे. भाजपशी जवळीक वाढवणारे महाडिक हे पाटील यांना कसे चालतात, असा आमदार गटाचा सवाल आहे. याच मुद्दय़ावर सतेज पाटील यांची जिल्हाध्यक्षांवर नाराजी आहे. जिल्हाध्यक्ष मात्र सहकारात राजकारण आणू नये या मताचे आहेत. दुसरीकडे, महाडिक हे जिल्हाध्यक्षांना दुखवायचे नाही आणि आपला विधान परिषदेचा मार्ग रोखणारे आमदार पाटील यांचे राजकारण संपुष्टात आणायचे, अशी दुहेरी नीती अवलंबत आहेत. या घडामोडीतून निर्माण झालेला विसंवाद पक्षबांधणीसाठी मारक ठरत आहे.

पराभूतांचा संघर्ष

हातकणंगले तालुक्यात एकेकाळी काँग्रेस पक्षाचे जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे असे दोघेही कॅबिनेट मंत्री होते. पाडापाडीच्या प्रयत्नात दोघांनाही विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभव चाखावा लागला. इतके होऊनही काही बोध घेतला तर ते काँग्रेसजन कसले? जिल्हा परिषद निवडणुकीत या उभयतातील संघर्ष नव्याने उफाळला आहे. इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुपुत्रास न दिल्याने आवळे नाराज झाले. आता त्यांनी रेंदाळ मतदारसंघात आवाडे यांच्या सुपुत्राच्या उमेदवारीस खोडा घालण्याचा पवित्रा घेतला असल्याने माजी मंत्री आपसात भांडण्यात मग्न आहेत.

कार्यकत्रे सरभर

कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या पुरोगामी जिल्ह्य़ात जातीयवादी पक्ष नको, असे म्हणणारा मोठा वर्ग असून तो काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. पण पक्षातील नेत्यांचे कधी सुप्त, कधी उघड संघर्ष पाहून काँग्रेस कार्यकत्रे, त्यांचा पाठीराखा वर्ग सरभैर झाला आहे आहे.

याचा परिणाम निवडणूक लढाऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. आजही उमेदवारी मागणाऱ्याची सर्वाधिक संख्या काँग्रेस पक्षाकडे आहे, पण नेत्यांची दुही ही मोठा अडसर ठरत आहे.