कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी कर्नाटक बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शेतकरी बांधवांनी वर्षभर शेतात काबडकष्ट करण्यार्या बैलांना सजवुन, पुजा करुन, गोडधोड खाऊ घातले. अनेक हौशी शेतकर्यांनी बैलांची गावातून सवाद्य मिरवणूकही काढली. दिवसभर शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावारण दिसत होते .महाराष्ट्र-कर्नाटक सिमाभागाजवळील असणाऱ्या अनेक गावात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.
इचलकरंजी येथे बैलांच्या लाकुड ओढण्याच्या शर्यतींना शतकोत्तरी परंपरा आहे. जनावरांच्या प्रदर्शनातही जातिवंत जनावरे सहभागी होत असतात. बेंदूर सणादिवशी विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण आणि कर तोडणीच्या कार्यक्रमामुळे तर गावभागाला जत्रेचे स्वरुप येते.पावसामुळे हिरमोड आज सकाळी शेतकर्यांनी बैलांना पंचगंगा नदीत न्हाऊ घालून आकर्षक सजावट करून सवाद्य मिरवणूक काढली. बैलांचे औक्षण करून महिलांनी गोडधोड खाऊ घातले. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सायंकाळी मिरवणुकीचे नियोजन केलेल्यांचा काहीसा हिरमोड झाला.
कर तोडण्याचा उत्साह
कौलव गावात बेंदूर सणानिमित्त बैलांच्या माध्यमातून कर तोडण्याचा विधी झाला. माणसांच्या गर्दीतून वाट काढत बैलाकडून कर तोडण्याचा प्रकार चित्तथरारक असा असतो. आबा बाळा पाटील कुटुंबियांना यावर्षी याचा हा मान मिळाला.