कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बँकेच्या माध्यमातून सामान्य माणसाला सामाजिक, आर्थिक न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायदानाचे कार्य व्हावे. कोल्हापूरला सर्किट बेंच न राहता त्याला खंडपीठाचा दर्जा मिळावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी येथे केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन आज न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक, आर्थिक समता प्रस्थापित झाल्यास लोकशाही मूल्ये रुजतील असे म्हटलेले होते. कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक न्यायदानाचे काम होत राहिले पाहिजे. कोल्हापूर खंडपीठाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र कोकणातील होतकरू वकिलना चांगली संधी प्राप्त होणार आहे. त्यांच्या उत्कर्षासाठी वसतिगृह बांधण्यासाठी नियोजित सर्किट बेंच जागेच्या ठिकाणीच एक एकर जमीन देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोल्हापूरच्या पाठीशी
गवई यांनी कोल्हापूर आणि पुणे येथून होणाऱ्या खंडपीठ मागणीचा संदर्भ घेतला. ते म्हणाले, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत केलेली होती. या विचारांच्या नगरीत सर्किट बेंच सुरू झाल्याने दूरवर राहणाऱ्या पक्षकारांची न्यायदानाची सोय होणार आहे. कर्नाटकातील गुलबर्गा लगत असणारी सोलापुरातील गावे, बेळगावला लागून असलेल्या चंदगड तालुक्यातील लोक असोत वा गोव्यालगत असलेल्या सावंतवाडीतील लोक यांना वेळ, पैसा, श्रम वाचवणारी न्यायव्यवस्था कोल्हापूर सर्किट बेंचच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने मी नेहमीच या मागणीच्या पाठीशी राहिलो आहे.
वकिलांच्या सोयीसाठी नको
पुणे येथून ही पाठिंबा देण्याबाबत विचारणा होत होती. कोणाचे नुकसान करायचे नाही असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे पुण्याला विरोध केला नाही तशीच त्याबाबतची वकिली केली नाही. पुणे परिसरातील चार – पाच हजार वकिलांना काम नाही म्हणून खंडपीठ असावे हा विचार रास्त वाटला नाही. सर्किट बेंच हे वकिलांसाठी नव्हे तर नागरिकांची सोय म्हणून झाले पाहिजेत. कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातील नागरिकांच्या सामाजिक आर्थिक न्यायाचे काम होईल असा असा माझा विचार राहिला आहे, असे गवई यांनी नमूद केले.
आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव
कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या कामासाठी तिन्ही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याचा सरन्यायाधीश गवई यांनी नामोल्लेख केला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या गतिमान निर्णयामुळे हे बेंच लवकर सुरू होऊ शकले, असे ते म्हणाले.
याचवेळी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सहा जिल्ह्यातील वकील, बार असोसिएशन, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यासह स्थानिक नेतृत्व, अधिकाऱ्यांचा उल्लेख केला.
लोकसत्ताचा नामोल्लेख
चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर तत्कालीन भाजपचे मंत्री व काँग्रेसचे माजी खासदार यांच्या प्रसिद्धीची होड लागली होती. त्यातून जागोजागी फलक उभे करून श्रेयवाद सुरू झाला होता. यावेळी ‘ लोकसत्ता’चे प्रतिनिधी देवेंद्र गावंडे यांनी हा नागपूर खंडपीठाचा विजय असल्याचा लेख लिहून वास्तव मांडले होते, असा आवर्जून उल्लेख सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केला.
कोल्हापूरच्या विकासाचे दालन – फडणवीस
कोल्हापूरला सर्किट बेंच होण्याचे ५० वर्षाच्या लढ्याचे शिवधनुष्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी समर्थपणे पेलले. सर्किट बेंच मुळे कोल्हापूरच्या विकासाचे दालन उघडले आहे. कोल्हापूरच्या इतिहासाला साजेसे काम यापुढे करत राहू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.