कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिकेविरोधात सार्वत्रिक संताप व्यक्त केला जात असताना उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मात्र रस्ते चकाचक करण्यात आले. महापालिकेच्या या कार्यक्षमतेवर उपहासात्मक टीका केली जात आहे.

कोल्हापूर शहरातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती शहरासह उपनगरांमध्ये पाहायला मिळत आहे. या विरोधात नागरिकांनी, विविध संघटनांनी आंदोलने करूनही महापालिकेने याबाबत पुरेशी दखल घेतलेली नाही. १०० कोटींचे रस्ते खड्ड्यात गेल्यात जमा आहेत. अनेक भागांतून रस्ते दुरुस्त केले जावेत, अशी मागणी होत असताना या मागणीला महापालिका प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जातात. तथापि, बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा गटमेळावा पार पडला. या निमित्ताने शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांनी पायधूळ झाडली. मंत्री येणार असल्याने महापालिका प्रशासनाला रातोरात जाग आली.

मार्केट यार्ड भागातील रस्ते दुरुस्त व्हावेत यासाठी या परिसरातील नागरिक गेली आठ ते दहा वर्षे पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी आंदोलने ही करण्यात आली. त्याची दखल घेतली नाही. मात्र, मंत्र्यांचे दौरे या परिसरात होणार असल्याचे सांगण्यात आल्यावर महापालिका प्रशासनाने संपूर्ण दिवस व रात्रभर काम करीत रस्ता गुळगुळीत केला. विशेष म्हणजे मंत्री जात असलेला रस्ता दुरुस्त करण्यात आला तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरचे खाचखळगे, खड्डे मात्र कायम आहेत.

मार्केट यार्डच्या दक्षिणेकडचा हा रस्ता एकेकाळी कोल्हापूर व्यापाराचा हमरस्ता म्हणून ओळखला जात होता. अलीकडे तेथे अस्ताव्यस्त गॅरेज सुरू झाल्याने बकालपणा आला आहे.मंत्री आल्यावरच महापालिका प्रशासनाला जाग कशी येते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाणार असलेल्या मार्गावर रातोरात रस्ते बनवण्यात आले होते. याची आठवण करीत अनेकांनी समाज माध्यमातून कोल्हापूर महापालिकेच्या पक्षपाती कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे कोल्हापुरातील रस्ते कामांना गती मिळावी, यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या प्रयत्नाची अर्धी बाजू उचलत कोल्हापूर महापालिकेने मंत्री जाणारे रस्ते तेवढे व्यवस्थित केले असून, शहरातील अन्य रस्त्यांची दुरवस्था कायमच राहिली आहे.