कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर परिसरातील व्यावसायिकांना विश्वासात घेऊन मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचना सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात विकासकामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरू आहे. शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत वेळेत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मिसाळ म्हणाल्या, महालक्ष्मी, जोतिबा मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना परिसरातील व्यावसायिक, सामान्य नागरिकांना पुनर्वसनाबाबत असणाऱ्या भीतीबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी. त्यांचे गैरसमज दूर झाल्यास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य मिळू शकेल.
श्री महालक्ष्मी मंदिराबाबत मंत्री मिसाळ यांनी सुचवलेल्या कामांचा समावेश आराखड्यात करण्याबरोबरच आणखी १०० कोटी रुपयांच्या कामांचा अंतर्भाव केला आहे. संबंधित व्यावसायिकांसोबत बैठका घेऊन पुनर्वसनाबाबतची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.